IND vs ENG 4th Test | पराभवाच्या जबड्यातून खेचला विजयश्रीसारखा ‘ड्रॉ’! Pudhari File Photo
स्पोर्ट्स

IND vs ENG 4th Test | पराभवाच्या जबड्यातून खेचला विजयश्रीसारखा ‘ड्रॉ’!

प्रथम शुभमन गिल, नंतर जडेजा-सुंदर; त्रिकुटाच्या शतकांनी इंग्लंड नामोहरम!

पुढारी वृत्तसेवा

मँचेस्टर; वृत्तसंस्था : भारतीय संघाची नौका पराभवाच्या छायेत गटांगळ्या खात होती, त्यावेळी विजय तर सोडाच; पण अगदी सामना अनिर्णीत राखण्याचे किनारेसुद्धा दूर-दूरपर्यंत दिसत नव्हते; पण ही तीच वेळ होती, ज्यावेळी तीन तारणहारांनी सूत्रे आपल्या हाती घेतली. ते म्हणजे, शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर अन् रवींद्र जडेजा. एकीकडे, शुभमन गिलने राजेशाही थाटातील फलंदाजीने आशेचा भक्कम पाया रचला. दुसरीकडे, रवींद्र जडेजा झुंजार, आक्रमक शतक झळकावत असताना त्याची बॅट जणू तळपती तलवारच बनली आणि हे त्रिकुट पूर्ण करणार्‍या वॉशिंग्टन सुंदरने हिमालयासारखी अढळ खेळी करत संयमाचा असा काही महामेरू रचला ज्यासमोर, इंग्लंडच्या सर्व आशा-अपेक्षा त्यावर आदळून धुळीस मिळाल्या. या त्रिकुटाने केवळ सामनाच वाचवला नाही, तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात शौर्याचे एक सोनेरी पान लिहिले. अगदी पराभवाच्या जबड्यातून ‘ड्रॉ’ खेचून आणला...अगदी विजयश्रीसारखा ‘ड्रॉ’!

या सामन्याच्या शेवटच्या दिवशी 2 बाद 174 धावांवरून खेळाला पुढे सुरुवात केल्यानंतर के. एल. राहुल (90) आणि शुभमन गिल (103) यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी रचून संघाचा डाव सावरला. या दोघांनी भारतीय डावाला स्थिरता दिली. मात्र, खरा थरार तर त्यानंतर सुरू झाला. अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी इंग्लिश गोलंदाजांचा धैर्याने सामना करत मैदानावर अक्षरशः तळ ठोकला आणि त्यांची हीच ठाण मांडून ठेवण्याची अजोड कामगिरी सामना अनिर्णीत राखण्यात लाख मोलाचे योगदान देणारी ठरली.

एकापाठोपाठ चार अर्धशतके झळकावणार्‍या जडेजाने (107*) येथे आपले पाचवे कसोटी शतक पूर्ण करताच जल्लोष केला, तर दुसर्‍या बाजूने वॉशिंग्टन सुंदरने (101*) आपले पहिले कसोटी शतक झळकावून अशा आव्हानात्मक वेळी आपली सचोटी, आपली उपयुक्तता अधोरेखित करण्यात किंचितही कसर सोडली नाही. त्याची खेळी संयम आणि द़ृढनिश्चयाचे प्रतीक होती आणि याच त्रिकुटाच्या बळावर भारताने हवाहवासा ‘ड्रॉ’ प्राप्त केला.

स्टोक्सचा ‘तो’ प्रस्ताव निष्फळ आणि इंग्लंडचे स्लेजिंगही निष्फळ!

भारतीय फलंदाजांची झुंज पाहून हताश झालेल्या इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने दिवसभरातील खेळात 15 षटके बाकी असताना बरोबरीचा प्रस्ताव दिला; पण शतकाच्या उंबरठ्यावरील जडेजाने तो नाकारला. यानंतर अनेकदा इंग्लंडच्या खेळाडूंनी शाब्दिक चकमक करत स्लेजिंगचे अस्त्रदेखील वापरले; पण ते ही निष्फळ ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT