महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अनिल बोंडे यांच्या हस्‍ते महाराष्‍ट्र केसरी किताबाची मानकरी पैलवान भाग्यश्री फंड हिला मानाची गदा प्रदान करण्यात आली.  Pudhari Photo
स्पोर्ट्स

वर्धा: महिला महाराष्ट्र केसरी किताबाची मानकरी ठरली भाग्यश्री फंड

Mahila Maharashtra Kesari: कोल्हापूरची अमृता पुजारी ठरली उपविजेता

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने वर्धा जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या वतीने रंगलेल्‍या महिला कुस्‍ती स्‍पर्धा पार पडल्‍या. यावेळी महाराष्ट्र महिला केसरी किताबासाठी कोल्हापुरची अमृता पुजारी व पुणे जिल्ह्याची भाग्यश्री फंड यांच्यातील कुस्‍ती रोमांचक ठरली. या सामन्यात भाग्यश्री फंड हिने विजय मिळवित महिला महाराष्ट्र केसरी किताब पटकविला. कोल्हापूरची अमृता पुजारी उपविजेता ठरली.

सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा, देवळी द्वारा आयोजित विदर्भ केसरी रामदास तडस इनडोअर क्रीडा स्टेडियम देवळी येथे 'महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत 2024-25 व वरीष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा पार पडली.

यावेळी बक्षीस वितरण सोहळ्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अनिल बोंडे, आमदार राजेश बकाने, आमदार सुमित वानखेडे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस, आमदार प्रताप अडसड, आमदार उमेश यावलकर, जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक अनुराग जैन, माजी खासदार सुरेश वाघमारे, सुनिल गफाट, माजी नगराध्यक्ष शोभा तडस आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी, देवळी सारख्या तालुक्याच्या ठिकाणी उत्कृष्ट इनडोअर स्टेडियम उभारुन राज्यस्तरीय उत्कृष्ट स्पर्धा आयोजित केल्या ही कौतुकाची बाब आहे. खेलो इंडियाच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. खेळाडूंना चांगल्या दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजे. यासाठी येणाऱ्या बजेटमध्ये क्रीडा क्षेत्राला भरीव तरतुद राहणार असल्याचे ते म्हणाले.

महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यात आलेल्या महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंचे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने स्वागत करून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर पुढे म्हणाले, जिल्ह्यात खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. यासाठी आवश्यक त्याबाबींसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे ते म्हणाले.

यावेळी माजी खासदार रामदास तडस, खासदार अनिल बोंडे, आमदार राजेश बकाने यांनीही मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र महिला केसरी विजेता भाग्यश्री फंड यांना मानाची चांदीची गदा देण्यात आली. तसेच स्पर्धेत विजेत्या आणि सहभागी खेळाडूंचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले. भाग्यश्री फंड यांनी यशाचे श्रेय कुटुंबीयांना दिले. ऑलिंपिकची तयारी सुरू असून त्यात पदक मिळवण्याचा प्रयत्न राहील, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT