निमिष पाडगांवकर
आपल्या देशात एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व आणि त्याच्या कर्तृत्वाला साजेसा सन्मान कधी मिळतो याचे काही ताळतंत्र नसते. अगदी 'पद्म' पुरस्कारातही हे दिसून येते. हे सन्मान म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाची पोहोचपावती असते तेव्हा ते कधीही मिळाले तरी त्यांचे महत्त्व कमी होत नाही; पण कायम प्रश्न पडतो की, काही सन्मान मिळायला इतका उशीर का व्हावा? अशाच एका देदीप्यमान कर्तृत्वाच्या माणसाच्या यथोचित सन्मानाची बातमी नुकतीच आली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विजय मर्चंट, सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर या मुंबईच्या महान खेळाडूंच्या नावाने स्टँड आहेत. त्यात आता भर पडणार आहे ती मुंबईच्याच अजून एका महान खेळाडूच्या नावाची ते म्हणजे दिलीप वेंगसरकर स्टँडची. वानखेडे स्टेडियमच्या नॉर्थ स्टँडच्या ब्लॉकला दिलीप वेंगसरकर यांचे नाव देण्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनने नुकतेच मंजूर केले. मुंबईच्या क्रिकेटपटूंमध्ये हा स्टँड मानाचा मानला जातो. आजचे आणि उद्याचे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय, रणजी व अन्य सामने तेथे बसून पाहणे गौरवाचे मानतात. अशा दर्दी आणि जाणकार रसिकांच्या स्टँडला हे नाव देण्याचे ठरवल्याबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनचे या निर्णयाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.
दिलीप वेंगसरकर यांची मैदानावरची आणि निवृत्तीनंतर क्रिकेटच्या सेवेसाठी केलेली कामगिरी इतकी महान आहे की, खरे तर हा सन्मान याआधीच व्हायला पाहिजे होता. सर्वाधिक कसोटी खेळलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत आजही दिलीप वेंगसरकर यांचा सर्व देशात पस्तीसावा क्रमांक आहे आणि भारतात सहावा क्रमांक आहे; पण जेव्हा ते 1992 मध्ये निवृत्त झाले तेव्हा या कसोटी खेळण्याच्या पंक्तीत त्यांच्यापुढे फक्त बॉर्डर, गावस्कर, कपिल देव, मियाँदाद आणि रिचर्डस् होते. क्रिकेटमध्ये आकडेवारीला महत्त्व असले तरी आकडेवारी रुक्ष असते आणि परिस्थितीचे वर्णन करू शकत नाही. दिलीप वेंगसरकर यांची आकडेवारी तर बोलकी आहेच; पण हेही लक्षात घेतले पाहिजे की, या धावा शतके त्यांनी जमवल्या त्या क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीच्या कालखंडात. वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघांकडे वेगवान गोलंदाजीचे तोफखाने तर होतेच; पण जगाच्या कोपर्यातल्या न्यूझीलंडकडेही हॅडलीसारखा कुठच्याही परिस्थितीत घातक वाटणारा गोलंदाज होता. त्याकाळी प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीचा अभ्यास करायला ना कुठचे व्हिडीओ अॅनालिसिस होते ना कठीण दौर्यासाठी मानसिक आणि शारीरिक फिटनेस राखण्यासाठी कार्यशाळा असायच्या. यामुळे निव्वळ उत्तम तंत्र, मानसिक कणखरता आणि संघासाठी झोकून द्यायच्या मनोवृत्तीने तेव्हाच्या न झाकलेल्या खेळपट्ट्या, त्यातला दमटपणा, बाऊन्सर किती टाकायचे यावर बंधन नाही अशा वातावरणात स्विंग, सीम पचवत खेळपट्टीवर उभे राहून काढलेल्या या धावांचे, शतकांचे मोल अमूल्य आहे.
या देदीप्यमान कामगिरीने दिलीप वेंगसरकर यांना 1987 च्या विस्डेन पंचकात स्थान तर मिळालेच; पण अजूनही एमसीसी वेंगसरकारांच्या कामगिरीचा आदर करते. 2007 मध्ये एमसीसीने स्टुअर्ट पिअर्सन नावाच्या चित्रकाराला खास मुंबईत पाठवून वेंगसरकारांचे तैलचित्र काढून लॉर्डस्च्या पॅव्हेलियनमध्ये ते लावले आहे. लॉर्डस्च्या म्युझियममध्ये वेंगसरकारांचे ग्लोव्हज आणि भारताचे ब्लेझरही ठेवले आहे.
वेंगसरकर आणि लॉर्डस् हे नाते अतूट आहेच; पण 1986 सालच्या इंग्लडविरुद्धच्या अभूतपूर्व मालिका विजयात त्यांची लीडस्ची कामगिरी या विजयाचा कळस गाठणारी होती. भारताने पहिल्या डावात भक्कम आघाडी घेतली तरी दुसर्या डावात 3 बाद 29 अवस्थेत वेंगसरकर मैदानात उतरले आणि शेवटपर्यंत नाबाद राहून शतक झळकावत आपली आघाडी भक्कम करत विजयाचा पाया रचला.
बीसीसीआयने त्यांना 2013-14 साली सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने गौरवले; पण घरच्या मैदानात मात्र त्यांचा यथोचित सन्मान झाला नव्हता. ज्या व्यक्तीने भारतीय क्रिकेटचे नाव उंचावले, मुंबई क्रिकेट हा ज्यांचा श्वास आहे आणि जगात त्यांच्या कारकिर्दीची दखल घेऊन सन्मान होत होते तिथे हा घरच्या मैदानावरचा सन्मान काही क्रिकेटेतर कारणांनी का होईना राहून गेला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिलीप वेंगसरकारांच्या निवृत्तीनंतर 28 वर्षांनी का होईना; पण वेंगसरकारांच्या कारकिर्दीला आणि निःस्वार्थीपणे केलेल्या मुंबई आणि भारताच्या क्रिकेट सेवेचा सन्मान केला आहे. कुठच्याही कौतुकापेक्षा आईची पाठीवरची थाप जास्त मोलाची असते. तेव्हा या घरच्या कौतुकाने दिलीप वेंगसरकर नक्कीच सुखावले असतील. यापुढे मुंबई किंवा भारताचे फलंदाज वानखेडे स्टेडियमवर फलंदाजीसाठी उतरतील आणि प्रतिस्पर्ध्यांचे क्षेत्ररक्षण बघायला चहूकडे नजर टाकतील तेव्हा एका बाजूला सुनील गावस्कर, दुसर्या बाजूला विजय मर्चंट आणि दोन समोरासमोर स्टँडस्ना सचिन तेंडुलकर आणि दिलीप वेंगसरकर यांची नावे बघतील तेव्हा कुठच्याही प्रतिस्पर्ध्यांच्या आक्रमणाला सामोरे जायची मानसिक तयारी आपोआप होईल. ही चार नावे म्हणजे मुंबई क्रिकेटची पुण्याई आहे. आतापर्यंत असलेल्या तीन नावांत हे चौथे नाव आल्याने वानखेडे स्टेडियमवरील ही मुंबईच्या फलंदाजीची चारधाम यात्रा आता पूर्ण झाली आहे.