Vozinha Inspiring Story Pudhari
स्पोर्ट्स

Vozinha Inspiring Story: 25 व्या वर्षी करिअरची सुरुवात, 40 व्या वर्षी विश्वचषकाचा हिरो; व्होजिन्हाची थक्क करणारी कहाणी

Who is Vozinha: स्पेनसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध 0-0 बरोबरी करत केप व्हर्डेने विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी केली.

पुढारी वृत्तसेवा

Who is Vozinha: फुटबॉल विश्वचषकात अनेक मोठे विक्रम पाहायला मिळत आहेत. मात्र काही सामने केवळ निकालामुळे नव्हे, तर त्यामागील भावनिक कहाणीमुळे कायम स्मरणात राहतात. स्पेनसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध 0-0 अशी बरोबरी साधत केप व्हर्डेने जेव्हा इतिहास रचला, तेव्हा त्या ऐतिहासिक क्षणाचा खरा नायक ठरला 40 वर्षीय गोलकिपर व्होजिन्हा.

अटलांटा स्टेडियममध्ये शेवटची शिट्टी वाजताच हजारो केप व्हर्डे समर्थकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मैदानावर खेळाडू एकमेकांना मिठी मारण्यासाठी धावत होते, तर प्रेक्षकांमध्ये जल्लोष सुरू होता. पण या सगळ्या उत्साहाच्या केंद्रस्थानी होता एक माणूस व्होजिन्हा.

सामना संपल्यानंतर त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण हा केवळ एक सामना नव्हता, तर आयुष्यभर पाहिलेलं स्वप्न साकर झालं होतं. सात वेळा गोल अडवत त्याने स्पेन सारख्या बलाढ्य संघालं रोखलं.

सामन्यानंतर बोलताना व्होजिन्हा भावूक झाला. त्याने सांगितलं की, हा क्षण त्याच्या आजी-आजोबांसाठी होता. त्यांच्या आधारामुळेच तो इथपर्यंत पोहचला. मात्र आज ते या जगात नाहीत. त्याची आईदेखील व्हिसा आणि आर्थिक अडचणींमुळे सामना पाहण्यासाठी येऊ शकली नाही.

व्होजिन्हाचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचे खरे नाव जोसिमार डायस. विशेष म्हणजे त्याने व्यावसायिक फुटबॉल कारकीर्द 25 व्या वर्षी सुरू केली. या वयात अनेकांसाठी करिअर संपलेलं असतं. पण त्याने हार मानली नाही.

केप व्हर्डेसारख्या छोट्या राष्ट्रात वाढताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तो उत्कृष्ट गोलरक्षक असला तरी त्याची उंची कमी असल्याने अनेकदा त्याची निवड होत नव्हती. संधीच्या शोधात त्याने पोर्तुगाल गाठलं. त्यानंतर स्लोव्हाकिया, अँगोला, मोल्डोव्हा आणि सायप्रस अशा विविध देशांत खेळत त्याने स्वतःची ओळख निर्माण केली. आज तो पोर्तुगालच्या दुसऱ्या विभागातील चाव्हेस क्लबकडून खेळतो.

40 वर्ष वय असलेला व्होजिन्हा विश्वचषकात खेळणारा सर्वात वयोवृद्ध खेळाडू ठरला. स्पेनविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेल्या प्रत्येक बचावावर स्टेडियम दणाणून जात होते. केप व्हर्डेच्या चाहत्यांसाठी ते गोल सारखेच क्षण होते. सोशल मीडियावरही त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. काही तासांतच त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या हजारोंवरून लाखोंमध्ये पोहोचली.

अवघ्या पाच लाख लोकसंख्या असलेल्या केप व्हर्डेसाठी हा निकाल खूप महत्त्वाचा होता. जगातील महासत्तांना टक्कर देण्याची ताकद केवळ पैशात किंवा मोठ्या नावांत नसते, तर संघभावना, जिद्द आणि आत्मविश्वासात असते, हे केप व्हर्डेने दाखवून दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT