हॅमिल्टन : पुढारी ऑनलाईन
भारताने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 2 बाद 54 धावांवरुन 50 षटकात 4 बाद 347 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरने दमदार शतकी खेळी केली. तर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लोकेश राहुलने धडाकेबाज फलंदाजी करत 64 चेंडूत नाबाद 88 धावा ठोकल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या 136 धावांच्या भागिदारीमुळे भारत 350 च्या जवळ पोहचला. भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने ट्विटरवरुन या दोघांचे आपल्या खास शैलीत कौतुक केले आहे.
भारताचे रन मशिन विराट कोहली न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 51 धावा करुन लवकर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलने भारताचा डाव फक्त सावरला नाही तर 300 च्या पुढची धावसंख्या उभारुन दिली. श्रेयसने दमदार 103 धावा करत एकदिवसीय कारकिर्दीतील आपले पहिले शतक झळकावले. तर सध्या भारतीय संघात नवा रोल मिळालेल्या लोकेश राहुलने आपण कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास एकदम फिट असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. त्याने नाबाद 88 धावांची खेळी केली.
याच दोघांच्याही खेळीवर खूष झालेल्या विरेंद्र सेहवागने ट्विट करुन दोघांचे कौतुक केले. सेहवागची बॅटिंग स्टाईल जशी युनिक होती तसेच त्याचे ट्विटही युनिक असतात. त्याने 'कडक लडका राहुल – नाम तो सुना होगा. श्रेयस अय्यर हे तुझे इयर (वर्ष)!' असे ट्विट केले. त्याने शाहरुख खानच्या 'कुछ कुछ होता हैं' चित्रपटातील 'राहुल नाम तो सुना होगा' हा डायलॉग लोकेश राहुलसाठी वापरला. तर श्रेयस अय्यरच्या आडनावाचे यमक जुळवत त्याचेही कौतुक केले.