स्पोर्ट्स

Virat Kohli : विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध 12 धावा करताच रचणार इतिहास!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli : आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेत अ गटात समाविष्ट असलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा खेळपट्टीवर असताना विराट कोहली बॅटने कशी कामगिरी करतो याकडेही लक्ष असेल. कोहलीचे टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तान संघाविरुद्ध खूप चांगले रेकॉर्ड आहे. कोहली या स्पर्धेची सुरुवात अपेक्षेप्रमाणे करू शकला नसला तरी पाकविरुद्धच्या सामन्यात तो नक्कीच मोठी खेळी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. त्याचबरोबर तो एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

विराटला 12 धावांची गरज

विराट कोहलीचा पाकिस्तानविरुद्ध टी-20 इंटरनॅशनलमधील रेकॉर्ड बघितला तर त्याने आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये 81.33 च्या उत्कृष्ट सरासरीने 488 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 5 अर्धशतकांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत कोहली या विश्वचषक सामन्यात आणखी 12 धावा करण्यात यशस्वी ठरला तर तो पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 500 धावा पूर्ण करेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 फॉरमॅटमध्ये हा आकडा गाठणारा कोहली पहिला खेळाडू ठरणार आहे. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध कोहलीचा विक्रम पाहिला तर त्याने 5 डावात 308 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 4 अर्धशतकी खेळीही पाहायला मिळाल्या आहेत.

भारताच्या नजरा सुपर 8 मध्ये स्थान मिळवण्यावर

भारतीय संघाने 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. आयर्लंडविरुद्धचा पहिला सामना 8 गडी राखून जिंकला. आता जर भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर सुपर 8 साठी त्यांचे स्थान जवळपास निश्चित होईल. कारण या सामन्यानंतर टीम इंडियाला त्यांच्या पुढील 2 सामन्यांमध्ये अमेरिका आणि कॅनडाच्या संघांशी सामना करावा लागणार आहे.

SCROLL FOR NEXT