'चेज मास्टर' म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये ओळखला जाणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आज, म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीत झाला. कोहलीने २००८ मध्ये पदार्पण केले, ज्यानंतर त्याच्या बॅटची जादू तिन्ही फॉरमॅटमध्ये पाहायला मिळाली. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टी२० आणि कसोटीमधून निवृत्ती घेतली आहे, तर तो सध्या वनडे फॉरमॅटमध्ये खेळत आहे. कोहलीच्या ३७ व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया ५ मोठ्या विक्रमांविषयी. हे विक्रम भविष्यात कोणत्याही खेळाडूला मोडणे सोपे नसेल.
विराट कोहलीचे वनडे फॉरमॅटमधील बॅटचे उत्कृष्ट प्रदर्शन वर्षानुवर्षे पाहायला मिळाले आहे, जिथे त्याला रोखणे गोलंदाजांसाठी नेहमीच कठीण आव्हान ठरले. वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात कमी डावांत १०,००० धावांचा टप्पा पार त्याने पार केला आहे. या बाबतीत कोहलीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला होता. सचिनने २५९ वनडे डावांत दहा हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तर कोहलीने त्याच्यापेक्षा ५४ डाव कमी म्हणजे २०५ डावांतच वनडेमध्ये १०,००० धावांचा आकडा गाठला.
जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहलीला 'चेज मास्टर' म्हणून ओळखले जाते. तो जोपर्यंत मैदानावर असतो, तोपर्यंत टीम इंडियाचा विजय निश्चित मानला जातो. वनडेमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना कोहलीने अशा अनेक खेळी खेळल्या आहेत, ज्या सर्व चाहत्यांना नेहमीच स्मरणात राहतील. वनडे फॉरमॅटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम किंग कोहलीच्या नावावर आहे. त्याने वनडेमध्ये अशा ७० खेळी केल्या आहेत.
विराट कोहलीचे २०२३ मध्ये झालेल्या वनडे विश्वचषकात सर्वात उत्कृष्ट प्रदर्शन पाहायला मिळाले. त्या स्पर्धेत तो वनडे विश्वचषकाच्या एकाच पर्वात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनला. त्याने ११ डावांमध्ये फलंदाजी करताना ९५.६२ च्या उत्कृष्ट सरासरीने एकूण ७६५ धावा केल्या. या दरम्यान, त्याच्या बॅटमधून तीन शतकी आणि ६ अर्धशतकी खेळी पाहायला मिळाल्या.
कोहलीने भारतीय संघाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. ज्यामध्ये त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचे मायदेशासोबतच परदेशी दौऱ्यांवरही उत्तम प्रदर्शन दिसून आले. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक द्विशतके झळकावण्याच्या बाबतीत कोहली पहिल्या क्रमांकावर आहे, त्याच्या बॅटमधून ७ द्विशतके झळकली आहेत.
२०२३ च्या वनडे विश्वचषकात विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात शतकी खेळी केली होती. त्या खेळीसह तो वनडेमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचला. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील ५० वे शतक ठरले होते. सध्या कोहलीची वनडेमध्ये एकूण ५१ शतके झाली आहेत, त्यामुळे त्याचा हा विक्रम भविष्यात कोणत्याही फलंदाजाला मोडणे सोपे नसेल.