स्पोर्ट्स

Virat Kohli brand value: मैदानानंतर मार्केटवर ‘कोहली’चे साम्राज्य! ३५४२ कोटींच्या ब्रँड व्हॅल्यूसह सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी

विराटसमोर शाहरुख, सचिन, धोनीचाही करिष्मा पडला फिका

रणजित गायकवाड

मुंबई : भारतीय क्रिकेटचा ‘किंग’ म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली मैदानावरील विक्रमांनंतर आता जाहिरात आणि व्यवसाय क्षेत्रातही नवा इतिहास रचत आहे. क्रिकेटमधील आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीच्या जोरावर कोहलीने ब्रँड मूल्याच्या बाबतीत देशातील अनेक दिग्गजांना मागे टाकत भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी म्हणून मानाचे स्थान पटकावले आहे.

फॉर्च्युन इंडिया आणि जागतिक ब्रँड सल्लागार संस्था इंटरब्रँड यांनी देशातील २५ सर्वाधिक मूल्यवान सेलिब्रिटींवर केलेल्या ताज्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

या अहवालानुसार, विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू तब्बल ३,५४२ कोटी रुपये इतकी असून तो भारतातील सर्वाधिक मूल्यवान व्यक्तिमत्त्वांच्या यादीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. विशेष म्हणजे, या शर्यतीत त्याने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान तसेच भारतीय क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांनाही मोठ्या फरकाने मागे टाकले आहे.

टॉप-१० मध्ये तीन क्रिकेटपटू

या विशेष अहवालातील अव्वल १० सेलिब्रिटींच्या यादीत तीन क्रिकेटपटू आणि सात चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा समावेश आहे. विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर शाहरुख खान आहे. जागतिक स्तरावर भारताची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनास तिसऱ्या स्थानावर असून ती महिला सेलिब्रिटींमध्ये सर्वाधिक मूल्यवान ठरली आहे. चौथ्या क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी असून पाचव्या स्थानी बॉलिवूडचा युवा स्टार रणवीर सिंह आहे.

मनोरंजन-क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा प्रभाव

या यादीत पुढे अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, आलिया भट्ट आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन यांचा समावेश आहे. त्यामुळे मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा या यादीवर मोठा प्रभाव असल्याचे स्पष्ट होते.

अव्वल १० च्या बाहेर संपूर्ण टॉप-२५ यादीकडे नजर टाकल्यास यात दीपिका पदुकोणने ११वे स्थान पटकावले आहे. तर दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना १७व्या क्रमांकावर आहे. याशिवाय अभिनेत्री कृती सेनन, ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळखली जाणारी नयनतारा आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना यांनाही या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळाले आहे.

मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील इतर नामवंतांमध्ये गायक व अभिनेता दिलजीत दोसांझ, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि अभिनेता विकी कौशल यांचाही समावेश आहे. मजबूत ब्रँड ओळख आणि व्यापक लोकप्रियतेच्या जोरावर या सर्वांनी या यादीत आपले स्थान निश्चित केले आहे.

सेलिब्रिटींची ब्रँड व्हॅल्यू नेमकी कशी ठरवली जाते?

सेलिब्रिटींची ब्रँड व्हॅल्यू नेमकी कशी ठरवली जाते, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता असते. सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या, वार्षिक उत्पन्न किंवा चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील यश यावरच ब्रँड मूल्य अवलंबून असते, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र इंटरब्रँडच्या या संशोधनात अधिक व्यापक आणि वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला.

या अभ्यासामध्ये सेलिब्रिटींच्या ब्रँड ताकदीचे मूल्यमापन करण्यासाठी सहा महत्त्वाच्या निकषांचा आधार घेण्यात आला. त्यामध्ये विश्वासार्हता, लोकांशी असलेले भावनिक नाते, लोकप्रियता, सामाजिक जबाबदारी, ब्रँडची एकूण ताकद आणि समाजावर पडणारा प्रभाव या घटकांचा समावेश होता. या सर्व पैलूंच्या सखोल विश्लेषणातून सेलिब्रिटींची वास्तविक ब्रँड किंमत निश्चित करण्यात आली. त्यामुळे ही यादी केवळ प्रसिद्धी किंवा कमाईवर आधारित नसून व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण प्रभावाचे प्रतिबिंब मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT