Virat Kohli on Shubman Gill file photo
स्पोर्ट्स

Ind vs Eng : स्टार बॉय.., शुभमन गिलबद्दल विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया; इंस्टा स्टोरी व्हायरल

Virat Kohli on Shubman Gill : भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने एजबॅस्टनमधील शुभमन गिलच्या शौर्यावर प्रतिक्रिया दिली.

मोहन कारंडे

India vs England Test 2025

एजबॅस्टन : भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात आणखी एका शानदार शतक ठोकले. १६१ धावांच्या उल्लेखनीय खेळीनंतर, भारताचा माजी कसोटी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली गिलच्या या खळबळजनक खेळीवर प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहू शकला नाही. गिलने सामन्याच्या दोन्ही डावात ४३० धावा केल्या, ज्यामुळे भारताने इंग्लंडसमोर ६०८ धावांचे आव्हान उभे केले. कोहलीने इन्स्टाग्रामवर गिलला "स्टार बॉय" असे म्हटले आहे.

कर्णधार शुभमन गिलच्या (161 धावा) दुसऱ्या शतकाच्या जोरावर भारताने शनिवारी एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव सहा बाद 427 धावांवर घोषित केला आणि इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचे अशक्यप्राय लक्ष्य ठेवले. पाचव्या दिवशी इंग्लंडचे फलंदाज अडचणीत असतील, कारण संघाने दुसऱ्या डावात दिवसअखेर 72 धावांत तीन गडी गमावले आहेत, ज्यात आकाश दीपने दोन तर मोहम्मद सिराजने एक बळी मिळवला. 'प्रिन्स' नावाने प्रसिद्ध असलेल्या गिलने एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावले होते. त्याने एकाच सामन्यातील दोन्ही डावांत शतके झळकावून आपले नाव इतिहासाच्या पानांवर कोरले आहे. यानंतर, क्रिकेटचा 'किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने इंस्टाग्राम स्टोरीवर गिलचे कौतुक केले आहे. कोहलीने लिहिले की, 'काय अप्रतिम खेळलास स्टार बॉय. इतिहास पुन्हा रचत आहेस. इथून तू फक्त पुढे आणि पुढेच जाशील. तू या सर्व गोष्टींना पात्र आहेस.'

गिलने चार डावांमध्ये तिसरे शतक झळकावत धावा काढण्याचा सपाटा कायम ठेवला. त्याने पहिल्या डावात 269 धावा केल्या होत्या. त्याच्याशिवाय दुसऱ्या डावात रवींद्र जडेजा (नाबाद 69), ऋषभ पंत (65) आणि केएल राहुल (55) यांनी अर्धशतके झळकावून योगदान दिले. भारताने चौथ्या दिवशी चहापानानंतर एका तासाने दुसरा डाव घोषित केला. मात्र, डाव घोषित करण्याच्या वेळेवर तज्ज्ञांनी आणि चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यात चेतेश्वर पुजाराने सांगितले की, भारताने किमान अर्धा तास आधी डाव घोषित करायला हवा होता. गिल बाद होऊनही जेव्हा डाव घोषित केला गेला नाही, तेव्हा होलीज स्टँडमधील इंग्लंडच्या चाहत्यांनी 'बोरिंग... बोरिंग...' अशा घोषणा दिल्या.

चहापानापूर्वी शतक पूर्ण करणाऱ्या गिलने शोएब बशीर आणि कामचलाऊ फिरकी गोलंदाज जो रूट यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत डीप स्क्वेअर आणि मिड-विकेटच्या दिशेने स्वीपचे फटके मारले. गिलच्या 162 चेंडूंच्या खेळीत 13 चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता, ज्यामुळे त्याने या सामन्यात एकूण 430 धावा केल्या. गिल आणि जडेजाने पाचव्या गड्यासाठी 175 धावांची भागीदारी केली. या कामगिरीमुळे गिलने एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयाच्या बाबतीत क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना मागे टाकले, ज्यांनी 1971 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध एका कसोटीत 344 धावा केल्या होत्या. एकाच कसोटीत द्विशतक आणि शतक झळकावणारा तो गावसकर यांच्यानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

दुसरीकडे, इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात तीन गडी गमावले आहेत आणि त्यांना विजयासाठी पाचव्या दिवशी 536 धावांची आवश्यकता आहे. आकाश दीपने धोकादायक बेन डकेट आणि जो रूट यांचे बळी घेतले, तर सिराजने झॅक क्रॉलीला आउटस्विंगरवर बॅकवर्ड पॉइंटला झेलबाद केले. हॅरी ब्रूक आणि ओली पोप नाबाद आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT