माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने विराटची पाठराखण करणारी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने कोहलीच्या दमदार कामगिरीची आठवण करून दिली आहे.
IPL 2026 srh vs rcb
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन दोन वर्षे उलटली असली, तरी विराट कोहली अजूनही या क्रिकेट प्रकारात 'फिनिश्ड' (संपलेला) नसल्याचे वारंवार सिद्ध करत आहे. शनिवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या IPL 2026 च्या सलामीच्या सामन्यात, विराटने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना ३८ चेंडूत नाबाद ६९ धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर RCB ने दणदणीत विजय मिळवला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विराट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीने टीकाकारांची बोलती बंद केली आहे.
सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने विराटची पाठराखण करणारी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने कोहलीच्या दमदार कामगिरीची आठवण करून दिली. एक्स पोस्टमध्ये कैफने लिहिले की, "कल्पना करा, ऑस्ट्रेलियात दोनदा शून्यावर बाद झाल्यानंतर लोक म्हणाले होते की विराट कोहली संपला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील त्याच्या शेवटच्या १० डावातील धावसंख्या पहा: ७४, १३५, १०२, ६५, १३१, ७७, ९३, २३, १२४ आणि या सामन्यातील नाबाद ६९."
कैफने कोहलीचे कौतुक केले असले, तरी अनेक चाहत्यांनी या पोस्टच्या 'टायमिंग'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विराट सध्या सातत्याने चांगली कामगिरी करत असताना आता त्याची पाठराखण करण्याची गरज काय, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. तसेच, काहींनी असेही नमूद केले की, पूर्वीची टीका प्रामुख्याने त्याच्या कसोटी क्रिकेटमधील फॉर्मबद्दल होती, मर्यादित षटकांच्या फॉरमॅटबद्दल नाही.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धi-rh सामन्यादरम्यान विराटने काही मोठे टप्पेही गाठले. IPL इतिहासात धावांचा पाठलाग करताना ४००० धावा पूर्ण करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. याशिवाय, त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत शोएब मलिकलाही मागे टाकले आहे. हे त्याचे आयपीएलमधील ६४ वे अर्धशतक होते. विराट कोहलीच्या सोबतीने देवदत्त पडिक्कलनेही वेगवान खेळी केली. RCB ने २०३ धावांचे लक्ष्य अवघ्या १५.४ षटकांत गाठले, ज्यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीलाच त्यांचा 'नेट रन रेट' चांगलाच सुधारला आहे.