विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघासाठी पाचव्‍यांदा विजेतेपदाचा सामना खेळणार आहे.  Pudhari.
स्पोर्ट्स

Virat Kohli IPL Final Record | विराट कोहली पाचव्‍यांदा खेळणार विजेतेपदाचा सामना; IPL फायनलमधील रेकॉर्ड कसा आहे?

virat kohli ipl final record | 2016 मध्ये ठोकले होते अर्धशतक

पुढारी वृत्तसेवा

Virat Kohli IPL Final Record

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ सलग दुसऱ्यांदा आयपीएलचा फायनल सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. हा संघ यापूर्वी चार वेळा विजेतेपदाच्या सामन्यापर्यंत पोहोचला असून त्यांनी एकदा ट्रॉफीही जिंकली आहे. आता फ्रेंचायझीकडे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.

पहिले विजेतेपद मिळवण्यासाठी १८ वर्षांची प्रतीक्षा

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला आपले पहिले विजेतेपद मिळवण्यासाठी १८ वर्षे लागली, परंतु त्यानंतर पुढील ट्रॉफीसाठी संघाला फारशी वाट पाहावी लागणार नाही, कारण संघ पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या आतापर्यंतच्या प्रवासात विराट कोहलीचे मोठे योगदान राहिले आहे. आधी कर्णधार म्हणून आणि आता केवळ फलंदाज म्हणून खेळणारा विराट कोहली या सामन्यातही संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

विराट कोहली पाचव्‍या फायनलसाठी सज्ज

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा अनुभवी फलंदाज विराट कोहली ५व्यांदा आयपीएल फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरेल. कोहलीला गेल्या वेळी मोठी खेळी करता आली नव्हती, पण यावेळी संघाला विजय मिळवून देण्यासाठी तो आपले सर्वोत्तम प्रदर्शन करू इच्छितो. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत चार आयपीएल फायनल खेळल्या आहेत. कोहलीने 2009, 2011, 2016 आणि 2025 मध्ये विजेतेपदाच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे प्रतिनिधित्व केले आहे.

फायनलमध्‍ये विराटची कामगिरी कशी राहिली?

विराट कोहलीने सर्वात आधी २००९ मध्ये फायनल सामना खेळला होता. डेक्कन चार्जर्सविरुद्धच्या त्या सामन्यात तो ८ चेंडूत केवळ ७ धावाच करू शकला होता. यानंतर २०११ मध्येही त्याच्या संघाने फायनलपर्यंतचा प्रवास केला, जिथे कोहलीच्या बॅटीतून ३२ चेंडूंमध्ये ३५ धावा निघाल्या. मात्र, संघाला ५८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. २०१६ मध्ये कर्णधार म्हणून त्याच्या संघाने फायनल गाठली होती, जिथे तो ३५ चेंडूंत ५४ धावा करून बाद झाला. त्या सामन्यात संघाला ८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. गेल्या हंगामात (2025) विराट कोहलीने पंजाब किंग्सविरुद्धच्या फायनलमध्ये ३५ चेंडूंत ४३ धावांची खेळी केली होती, जिथे संघाने ६ धावांनी विजय मिळवून आपले पहिले विजेतेपद पटकावले होते.

विराटची यंदाच्‍या आयपीएल हंगामातील कामगिरी

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची यंदाच्‍या आयपीएलमधील कामगिरी दमदार राहिली आहे. या हंगामात तो लागोपाठच्या सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला होता, पण त्यानंतर त्याने शतकही ठोकले. कोहलीने आपल्या संघाला फायनलपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोहलीने गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्धच्या क्वालिफायर-१ मध्ये २५ चेंडूंत ४३ धावांची खेळी केली आणि याचसोबत या हंगामात आपल्या ६०० धावा पूर्ण केल्या. तो आयपीएलच्या इतिहासात लागोपाठ ४ हंगामात (2023, 2024, 2025, 2026) ६००+ धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT