विराट कोहली. (संग्रहित छायाचित्र) 
स्पोर्ट्स

अहंकार बाजूला ठेवून सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळतो : विराट कोहली

Virat kohli : सामन्याचा गतीमान प्रवाह कायम ठेवणे हेच ध्येय

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli : अहंकार बाजूला ठेवून सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळणे हे माझ्या फलंदाजीचे मुख्य तत्त्व आहे, असे म्हणत महान फलंदाज विराट कोहलीने टीकाकरांना प्रत्युत्तर दिले आहे. JioHotstar ला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याची भावना व्यक्त केली. आधुनिक युगातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेल्या कोहलीने अलीकडेच आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. तो टी-20 क्रिकेटमध्ये 13000 धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

गेल्या काही वर्षांत, विशेषतः 2024 टी-20 विश्वचषकापूर्वी 36 वर्षीय कोहलीवर टी-20 क्रिकेटमधील त्याच्या स्ट्राइक रेटबाबत अनेकदा टीका झाली. तरीसुद्धा, संघ व्यवस्थापनाला त्याच्या क्षमतेबाबत कोणतीही शंका नव्हती आणि त्यांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला. कोहलीने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली, ज्यामुळे त्याला ‘प्लेयअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले.

कोहली म्हणाला, ‘माझ्या फलंदाजीमध्ये कधीच अहंकाराला स्थान नाही. माझा उद्देश कधीच कोणावर मात करणे किंवा झाकून टाकणे हा नसतो, तर परिस्थितीनुसार खेळणे आणि सामन्याचा गतीमान प्रवाह कायम ठेवणे हेच माझे मुख्य ध्येय असते. मला या गोष्टीचा नेहमी अभिमान आहे. मी नेहमीच परिस्थितीनुसार खेळू इच्छितो. मी लयीत असतो तेव्हा मी नैसर्गिकरित्या पुढाकार घेतो. पण जर दुसरा फलंदाज अधिक चांगली खेळी करत असेल तर तो पुढाकार घेतो,’ असेही त्याने मुलाखतीत सांगितले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफाट यश मिळवूनही, विराट कोहली आजपर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. काही वेळा तो अगदी जवळ गेला, पण रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघ तीनही अंतिम सामन्यांत अपयशी ठरला. आरसीबीने 2025 मध्ये आयपीएलच्या 18व्या हंगामात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील शानदार सुरुवात केली आहे. संघाने चारपैकी तीन सामने जिंकून सध्या गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले आहे.

सध्या सुरू असलेल्या हंगामात संपूर्ण लक्ष विराट कोहलीवर केंद्रित आहे. आरसीबी यंदा विजेतेपदाच्या शर्यतीतील प्रमुख संघांपैकी एक आहे. कोहलीवरही तितकाच दबाव आहे, कारण तो आयपीएलच्या आपल्या 18व्या हंगामात खेळत आहे, पण अद्याप एकदाही ट्रॉफी जिंकलेली नाही. विशेष म्हणजे, तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 256 सामन्यांत 8168 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने स्पर्धेतील सर्वाधिक आठ शतके ठोकली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT