Virat Kohli Replacement: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आगामी वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज विराट कोहली दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला असून आता त्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार, याची चर्चा रंगली आहे. संघ व्यवस्थापनासमोर सध्या दोन प्रमुख पर्याय आहेत – ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड.
आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात विराट कोहलीला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. मात्र, दुखापत असूनही त्याने अखेरपर्यंत खेळत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण स्पर्धेत त्याने 675 धावा करत शानदार कामगिरी केली होती. पण आता हीच दुखापत त्याच्या वनडे मालिकेतील सहभागाच्या आड आली आहे.
14 जूनपासून सुरू होणाऱ्या भारत-अफगाणिस्तान वनडे मालिकेत कोहली खेळणार नसल्याने भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विशेषतः तिसऱ्या क्रमांकावरील त्याची जागा भरून काढणे हे संघ व्यवस्थापनासाठी आव्हान ठरणार आहे.
या शर्यतीत सर्वात आघाडीवर असलेले नाव म्हणजे ईशान किशन. भारतीय संघात आधीच समावेश असलेल्या ईशानला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. वनडे क्रिकेटमध्ये त्याने चार वेळा या क्रमांकावर फलंदाजी केली असून 40.75 च्या सरासरीने 163 धावा केल्या आहेत. त्यात 93 आणि 59 धावांच्या खेळींचाही समावेश आहे. त्यामुळे या क्रमांकावर त्याचा अनुभव आणि आकडेवारी दोन्ही त्याच्या बाजूने आहेत.
दुसरा पर्याय म्हणजे ऋतुराज गायकवाड. विराट कोहलीच्या जागी अधिकृत बदली खेळाडूची घोषणा झाल्यास ऋतुराजचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. सध्या तो भारत-अ संघाचा उपकर्णधार असून श्रीलंकेत होणाऱ्या त्रिकोणी मालिकेसाठी सज्ज आहे.
ऋतुराजने डिसेंबर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात शानदार शतक झळकावले होते. त्या सामन्यात त्याने 105 धावांची खेळी करत आपली क्षमता दाखवून दिली होती. मात्र वनडेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर त्याची कामगिरी फार प्रभावी राहिलेली नाही. या स्थानावर खेळलेल्या दोन डावांत त्याला केवळ 27 धावा करता आल्या आहेत.
दरम्यान, श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर कायम राहण्याची शक्यता असल्याने ऋतुराजला संघात स्थान मिळालेच तर त्याला तिसऱ्या क्रमांकावरच खेळावे लागू शकते.
अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका सुरू होण्यास काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडिया कोणावर विश्वास दाखवते, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. ईशान किशन की ऋतुराज गायकवाड यापैकी कोणाला संधी मिळते हे लवकरच स्पष्ट होणार आहे.