स्पोर्ट्स

Virat-Rohit Team India Future : रोहित-विराट पर्व संपुष्टात? २०२७ विश्वचषकापूर्वी BCCI घेणार मोठा निर्णय!

२०२७ च्या विश्वचषकापर्यंत रोहित आणि विराट हे दोघेही वयाच्या चाळीशीच्या उंबरठ्यावर...

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे दोन दिग्गज खेळाडू, विराट कोहली आणि रोहित शर्मा, यांनी ट्वेन्टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. आता हे दोन्ही दिग्गज खेळाडू केवळ वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहेत. तथापि, २०२७ मध्ये होणाऱ्या पुढील वनडे विश्वचषक स्पर्धेत त्यांचा सहभाग असेल का? यावर आता क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच या दोन्ही खेळाडूंच्या भवितव्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचे संकेत मिळत आहेत.

एका विश्वसनीय सूत्राने वृत्तसंस्था 'पीटीआय'ला दिलेल्या माहितीनुसार, २०२७ च्या विश्वचषकापर्यंत विराट आणि रोहित हे दोघेही वयाच्या चाळीशीच्या उंबरठ्यावर असतील. त्यामुळे, तब्बल १४ वर्षांनी पुन्हा एकदा विश्वविजेतेपद पटकावण्याच्या दृष्टीने एक स्पष्ट आणि दूरगामी योजना आखणे आवश्यक आहे. यासाठी संघात काही युवा खेळाडूंना वेळेवर संधी देणे महत्त्वाचे ठरेल, असेही या सूत्राने नमूद केले.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवताना भारताने पाचही सामन्यांमध्ये कडवी झुंज दिली. या मालिकेत यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, ऋषभ पंत, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांसारख्या खेळाडूंनी प्रभावी कामगिरी करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या नवीन पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी या वरिष्ठ खेळाडूंशी व्यावसायिक स्तरावर चर्चा केली जाईल, ज्यामध्ये त्यांची मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती विचारात घेतली जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

२०२७ विश्वचषकापूर्वी होणार महत्त्वपूर्ण चर्चा

'पीटीआय'शी बोलताना सूत्राने सांगितले, ‘या विषयावर लवकरच चर्चा अपेक्षित आहे. आगामी वनडे विश्वचषकासाठी आपल्याकडे दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही तोपर्यंत चाळीशीच्या जवळ पोहोचलेले असतील. २०११ मध्ये आपण विश्वचषक जिंकला होता आणि अशा मोठ्या स्पर्धेसाठी एक सुस्पष्ट योजना असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने, युवा खेळाडूंना संधी देण्याची गरज आहे.’

उल्लेखनीय आहे की, २०२४ मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर तत्कालीन कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर कसोटी क्रिकेटमधील त्यांची कामगिरी काहीशी खालावलेली दिसली आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी दोघांनीही कसोटी क्रिकेटला अलविदा केला. त्यांना कसोटीतून निवृत्तीसाठी भाग पाडले गेले का? अशी चर्चा क्रिकेटरसिकांमध्येही सुरू होती. आता या पार्श्वभूमीवर, त्यांना वनडे संघातूनही हळूहळू वगळले जाईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वनडे क्रिकेटमधून निवृत्तीसाठी दबाव टाकला जाणार नाही

सूत्रांनी पुढे सांगितले की, ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे आणि त्यांनी जवळपास सर्वकाही मिळवले आहे. त्यामुळे, मला नाही वाटत की त्यांच्यावर निवृत्तीसाठी कोणताही दबाव टाकला जाईल. परंतु, विश्वचषकाच्या नवीन पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांच्याशी नक्कीच चर्चा होईल. या चर्चेत ते मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कोणत्या स्थितीत आहेत, याचा आढावा घेतला जाईल.’

या दोन्ही खेळाडूंनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च महिन्यात (चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामना) खेळला होता. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी ट्वेन्टी-२० स्वरूपात असल्याने त्यातही ते खेळताना दिसणार नाहीत. ऑगस्ट महिन्यात बांगलादेश विरुद्ध होणारी वनडे मालिकादेखील स्थगित झाली आहे. आता भारताची पुढील वनडे मालिका ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. संघातील आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी या दोन्ही मालिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणे कोहली आणि रोहितसाठी अनिवार्य असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT