माजी कुस्तीपुटू आणि काँग्रेस आमदार विनेश फोगाट. File Photo
स्पोर्ट्स

नोकरी किंवा भूखंड नकाे! विनेश फोगाटने दिली राेख ४ कोटींच्‍या बक्षीसाला पसंती

पॅरिस ऑलिंपिकनंतर हरियाणा सरकारने दिले होते बक्षीसाचे तीन पर्याय

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : माजी कुस्तीपुटू आणि हरियाणातील जुलाना विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार विनेश फोगट ( Vinesh Phogat) यांनी हरियाणा सरकारकडून मिळणार्‍या सरकारी नोकरी, भूखंडाला नकार दिला आहे. त्‍यांनी ४ कोटी रुपयांच्या रोख बक्षीसाची निवड केली आहे.

२०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये विनेश फोगाटने अंतिम फेरीत धडक मारली होती;पण १०० ग्रॅम वजन वाढल्यामुळे तिला अंतिम सामना खेळण्यापूर्वीच स्‍पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. या वेळी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी विनेश फोगाटला रौप्यपदक विजेता म्हणून सन्मानित करण्याची घोषणा केली होती. तिला नोकरी, भूखंड किंवा ४ कोटी रुपयांची रोकड असे बक्षीसरुपी तीन पर्याय देण्‍यात आले होते. आता विनेश फोगट यांचे संमती पत्र क्रीडा विभागाला प्राप्त झाले आहे. त्‍यांनी ४ कोटी रुपयांच्या रोख बक्षीसाची निवड केली आहे, असे वृत्त 'द इंडियन एक्स्प्रेस'ने दिले आहे.

हरियाणा सरकारने ८ महिन्‍यांपूर्वी केली होती बक्षीसाची घोषणा

विनेश फोगाटला नोकरी, भूखंड किंवा ४ कोटी रुपयांची रोकड असे बक्षीसरुपी तीन पर्याय ८ महिन्यांपूर्वी देण्‍यात आले होते. मात्र हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी यांनी याची पूर्तता न केल्‍याने फोगाटने यावर हरियाणा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सवाल केला होता. यानंतर, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्‍यमंत्री सैनी यांनी विनेशला सरकारी नोकरी किंवा हरियाणा शहरी विकास प्राधिकरणाचा भूखंड किंवा राज्याच्या २०१९ च्या रोख पुरस्कार क्रीडा धोरणानुसार ४ कोटी रुपयांचा रोख पुरस्कार यापैकी एक निवडण्याचा पर्याय दिला हाेता. या तीन पर्यायांपैकी तिने ४ कोटी रुपयांच्या रोख बक्षीसाची निवड केली आहे.

वजन १०० ग्रॅम अधिक भरल्‍याने विनेशने गमावले होते पदक

विनेश फोगाटने पॅरिस ऑलिंपिकमध्ये ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. ७ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या सामन्यापूर्वी तिचे वजन १०० ग्रॅमपेक्षा अधिक भरले. यामुळे तिला स्‍पर्धेतूनच अपात्र ठरवण्यात आले. तिने पदकापासून वंचित राहावे लागले. ८ ऑगस्ट २०२४ रोजी विनेशने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली. ६ सप्टेंबर २०२४ रोजी तिने काँग्रेस पक्षात प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली. जुलाना विधानसभा मतदारसंघातून ती ६,००० पेक्षा जास्त मतांनी विजयी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT