स्पोर्ट्स

Vijay Hazare Trophy : विराट कोहलीच्या धडाकेबाज खेळीने दिल्लीचा विजय

मुंबईची उत्तराखंडवर, तर महाराष्ट्राची सिक्कीमवर मात

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : विजय हजारे ट्रॉफी 2025-26 च्या दुसऱ्या फेरीत शुक्रवारी देशभरात अनेक चुरशीचे सामने पाहायला मिळाले. दिल्लीने गुजरातचा पराभव करून आपली विजयी घोडदौड कायम ठेवली, तर मुंबईने उत्तराखंडवर विजय मिळवत स्पर्धेत दुसरे यश संपादन केले.

डी गु्रपमध्ये दिल्लीने अटीतटीच्या सामन्यात गुजरातचा 7 धावांनी पराभव केला. विराट कोहली (77) आणि ऋषभ पंत (70) यांच्या अर्धशतकांमुळे दिल्लीने 254 धावा केल्या होत्या. गु्रप सीमध्ये मुंबईने उत्तराखंडवर 51 धावांनी विजय मिळवला.

मुंबईने 331 धावांचा डोंगर उभा केला होता, ज्यात हार्दिक तामोरने नाबाद 93 आणि सर्फराज खान व मुशीर खान यांनी शतकी भागीदारी केली होती. बी ग्रुपमध्ये विदर्भाने हैदराबादचा 89 धावांनी पराभव केला. ध्रुव शोरेने सलग दुसरे शतक झळकावत नाबाद 109 धावांची खेळी केली.

ए ग्रुपमध्ये कर्नाटकने 8 गडी राखून केरळवर दणदणीत विजय मिळवला. करुण नायरने नाबाद 130 आणि देवदत्त पडिक्कलने शतक झळकावत विजयात मोलाचा वाटा उचलला. सी गु्रपमध्ये महाराष्ट्राने सिक्कीमचा 8 गडी राखून पराभव केला. सलामीवीर पृथ्वी शॉने 50 धावांची वेगवान खेळी केली.

दुसऱ्या फेरीचे संक्षिप्त निकाल

  • ग्रुप ए : मध्य प्रदेश 2 गडी राखून विजयी : विरुद्ध तामिळनाडू

  • ग्रुप ए : कर्नाटक 8 गडी राखून विजयी : विरुद्ध केरळ

  • ग्रुप बी : उत्तर प्रदेश 227 धावांनी विजयी : विरुद्ध चंदीगड

  • ग्रुप बी : विदर्भ 89 धावांनी विजयी : विरुद्ध हैदराबाद

  • ग्रुप सी : मुंबई 51 धावांनी विजयी : विरुद्ध उत्तराखंड

  • ग्रुप सी : पंजाब 9 गडी राखून विजयी : विरुद्ध छत्तीसगड

  • ग्रुप डी : दिल्ली 7 धावांनी विजयी : विरुद्ध गुजरात

  • ग्रुप डी : हरियाणा 6 गडी राखून विजयी : विरुद्ध सौराष्ट्र

शुक्रवारी चमकलेले स्टार खेळाडू :

1. रिंकू सिंग (उत्तर प्रदेश) : चंदीगडविरुद्ध केवळ 56 चेंडूत नाबाद शतक ठोकले.

2. यशवर्धन दलाल (हरियाणा): सौराष्ट्रविरुद्ध नाबाद 164 धावांची मॅरेथॉन खेळी केली.

3. ध्रुव शोरे (विदर्भ): सलग 5 व्या लिस्ट ए सामन्यात शतक झळकावून जागतिक विक्रमाची बरोबरी केली.

4. राज लिंबाणी (बडोदा) : बंगालविरुद्ध 5 बळी मिळवून विजयात मोठी भूमिका बजावली.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये शुक्रवारी मुंबई आणि उत्तराखंड यांच्यातील सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. क्षेत्ररक्षण करताना मुंबईचा युवा सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सामन्याच्या 30 व्या षटकात ही घटना घडली. उत्तराखंडचा फलंदाज सौरभ रावत याने ऑफ-स्पिनर तनुष कोटियानच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारला. डीप मिड-विकेटवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या अंगक्रिशने धावत येत हा कठीण झेल पकडण्याचा प्रयत्न केला. झेल पकडण्याच्या प्रयत्नात अंगक्रिश जोरात जमिनीवर पडला. यामुळे त्याच्या खांद्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली, तसेच डोके जमिनीवर आदळल्याने त्याला कन्कशन (मेंदूला धक्का) जाणवू लागला. सुरुवातीला तो काही सेकंद बसून राहिला, पण नंतर वेदनेने तो जमिनीवरच आडवा झाला.

मुंबईच्या फिजिओने तातडीने मैदानात धाव घेतली. अंगक्रिशला स्वतःच्या पायावर उभे राहणे कठीण होत असल्याने, त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. त्यानंतर जयपूरमधील नजीकच्या हॉस्पिटलमध्ये त्याला हलवण्यात आले. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्याचे सीटी स्कॅन आणि इतर चाचण्या केल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT