बंगळूर : देवदत्त पडिक्कल आणि अनुभवी फलंदाज करुण नायर यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर गतविजेत्या कर्नाटकने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा ‘व्हीजेडी’ नियमानुसार 54 धावांनी पराभव केला. या विजयासह कर्नाटकने सलग चौथ्यांदा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
सोमवारी झालेल्या या सामन्यात मुंबईने विजयासाठी दिलेल्या 255 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्नाटकने 33 षटकांत 1 बाद 187 धावा केल्या होत्या. याचवेळी पावसाने व्यत्यय आणल्याने खेळ थांबवावा लागला. व्हीजेडी नियमानुसार या टप्प्यावर विजयासाठी कर्नाटकने 132 धावा केलेले असणे आवश्यक होते. कर्नाटकने यापेक्षा 55 धावा अधिक केल्या असल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवालने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईची सुरुवात खराब झाली आणि 17.2 षटकांत 60 धावांवर 4 गडी बाद झाले. मुंबईचा डाव सावरताना शम्स मुलाणीने 91 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीने 86 धावांची झुंजार खेळी साकारली. मुंबईने शेवटच्या 5 षटकांत 59 धावा वसूल केल्यामुळे त्यांना 8 बाद 254 धावांपर्यंत मजल मारता आली.
विजयाचा पाठलाग करताना कर्नाटकने कर्णधार मयंक अग्रवाल (12) स्वस्तात बाद झाला. मात्र, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या देवदत्त पडिक्कलला मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी दोन जीवदान दिले, याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. पडिक्कल (नाबाद 81) व करुण नायर (नाबाद 74) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 143 धावांची अभेद्य भागीदारी करत संघाचा विजय सुकर केला.