स्पोर्ट्स

Mohammed Siraj : 6,6,6.. सिराजचा फलंदाजीत धुमाकूळ! अंतिम षटकात भारताला मिळवून दिला विजय

VIDEO : सिराजची तुफानी खेळी आणि षटकारांची हॅटट्रिक

रणजित गायकवाड

कोलंबो : श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत चौफेर फटकेबाजी केली. या सामन्यात भारतीय सलामीवीरांपासून ते तळाच्या फलंदाजांपर्यंत सर्वांनाच फलंदाजीची नामी संधी मिळाली, ज्याचा पुरेपूर फायदा घेत त्यांनी प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले. शनिवारी गुरनूर ब्रारने एकाच षटकात चार षटकार मारून छाप पाडली होती, तर रविवारी मोहम्मद सिराजने वादळी फलंदाजी करत अंतिम षटकात षटकारांची हॅटट्रिक साजरी केली. त्याने विजयी षटकार खेचत भारतीय संघाला शानदार विजय मिळवून दिला. या तीन दिवसीय सराव सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका क्रिकेट इलेव्हनचा ६ गडी राखून पराभव केला.

सिराजची तुफानी खेळी आणि षटकारांची हॅटट्रिक

विजयासाठी मिळालेल्या २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४५ षटकांत ४ गडी गमावून २१४ धावा करत सामन्यावर आपले नाव कोरले. तळाच्या फळीतील फलंदाज मोहम्मद सिराजने अवघ्या १५ चेंडूंत सलग तीन षटकार ठोकत नाबाद ३२ धावांची आक्रमक खेळी साकारली. दुसऱ्या डावातील ४३ व्या षटकात मानव सुतार जायबंदी (रिटायर्ड हर्ट) होऊन मैदानाबाहेर पडल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या सूचनेनुसार मोहम्मद सिराज फलंदाजीसाठी मैदानात उतरला.

सिराजने सूत्रे हातात घेत ४४ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर दणदणीत षटकार ठोकला. त्यानंतर ४५ व्या षटकात गोलंदाज केशरा नुवानथाविरुद्ध आक्रमक पवित्र स्वीकारत त्याने सलग तीन चेंडूंवर तीन षटकार मारत हॅटट्रिक पूर्ण केली. त्याच्या या तिसऱ्या षटकारानेच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विजय निश्चित झाल्यानंतरही सिराजने आपली फटकेबाजी सुरूच ठेवत याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर चौकार लगावला.

सामन्याचा सविस्तर वृत्तांत

रविवारी सकाळी भारतीय संघाने आपला पहिला डाव ६ बाद ३५७ धावांवर घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने निशान मदुश्का (६३), निपुण धनंजय (४६) आणि अंजला बंडारा (३५) यांच्या उपयुक्त पार्यांच्या जोरावर ६ बाद २०० धावा करून आपला डाव घोषित केला व भारतासमोर विजयासाठी २०७ धावांचे लक्ष्य ठेवले.

२०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताचे नियमित कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानात उतरली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भक्कम भागीदारी रचून संघाला मजबूत सुरुवात करून दिली. २१ व्या षटकात शुभमन गिलच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. गिलने ५४ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ४४ धावा केल्या. दुसऱ्या बाजूने आक्रमक खेळणाऱ्या यशस्वी जयस्वालने ४६ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी करत ६१ धावांची धडाकेबाज खेळी केली.

त्यानंतर ऋषभ पंत (२८) आणि ध्रुव जुरेल (१७) स्वस्तात बाद झाले. रवींद्र जडेजाने २२ तर मानव सुतारने २ धावांचे योगदान दिले. शेवटी मोहम्मद सिराजने १५ चेंडूंत १ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ३२ धावांची सामनावीर ठरेल अशी खेळी केली. भारताने ४५ षटकांत ४ बाद २१४ धावा करत ६ गडी राखून सामना जिंकला. श्रीलंका इलेव्हनकडून केशरा नुवानथाने २ बळी घेतले, तर विश्वा फर्नांडो आणि रमेश मेंडिस यांनी प्रत्येकी १ फलंदाज बाद केला.

तत्पूर्वी, श्रीलंकेने आपला पहिला डाव ८ बाद ३६३ धावांवर घोषित केला होता, तर प्रत्युत्तरादाखल भारताने पहिला डाव ६ बाद ३५७ धावांवर घोषित केला होता. श्रीलंकेच्या दुसऱ्या डावातील ६ बाद २०० धावांच्या जोरावर भारताला मिळालेले आव्हान सिराजच्या फटकेबाजीमुळे सहज पार पडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT