Vaibhav Suryawanshi
वॉर्सेस्टर : युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आपल्या विक्रमी खेळीचे श्रेय शुभमन गिलला दिले आहे. शतक झळकावल्यानंतरही गिलला दबावाशिवाय खेळताना पाहून मोठी प्रेरणा मिळाली, असे सूर्यवंशीने म्हटले आहे. तसेच आगामी सामन्यांमध्ये तो भारतीय कसोटी कर्णधाराचा आदर्श घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्याने सांगितले. सूर्यवंशीने शनिवारी वॉर्सेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध भारत १९ वर्षांखालील संघाकडून चौथ्या सामन्यात केवळ ७८ चेंडूंत १४३ धावांची शानदार खेळी केली. यासह, तो एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला.
आपल्या विक्रमी खेळीनंतर बीसीसीआयच्या 'एक्स' अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सूर्यवंशी म्हणाला, "मला शुभमन गिलकडून खूप प्रेरणा मिळाली. मी त्याचा खेळ पाहिला होता. १०० आणि २०० धावा केल्यानंतरही तो ज्या सहजतेने आणि दबावाशिवाय खेळत होता, ते पाहून मी खूप प्रभावित झालो." विशेष म्हणजे, गिलने बर्मिंगहॅम कसोटीत द्विशतक झळकावले होते, त्यावेळी भारताचा १९ वर्षांखालील संघही तिथेच उपस्थित होता. "पुढच्या सामन्यात मी द्विशतक करण्याचा आणि पूर्ण ५० षटके खेळण्याचा प्रयत्न करेन," असा आत्मविश्वासही वैभवने व्यक्त केला.
या खेळीदरम्यान आपण विश्वविक्रम रचला आहे, याची वैभवला कल्पनाच नव्हती. तो म्हणाला, "मी विक्रम केला आहे हे मला ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर समजले. आमचे संघ व्यवस्थापक अंकित सरांनी मला याची माहिती दिली आणि त्यानंतर सर्वांनी माझे अभिनंदन केले."
भारताच्या १९ वर्षांखालील संघाने शनिवारी चौथ्या सामन्यात इंग्लंडचा ५५ धावांनी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी अजिंक्य आघाडी घेतली. आयपीएल २०२५ मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या सूर्यवंशीने ५० षटकांच्या स्वरूपातही आपली क्षमता सिद्ध केली. त्याने फक्त ७८ चेंडूंत १३ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १४३ धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १८३ होता. भारताने नऊ विकेट गमावून ३६३ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा संघ ४५.३ षटकांत ३०८ धावांत गुंडाळला गेला. नमन पुष्पकने ६३ धावांत तीन विकेट घेतल्या. सूर्यवंशीने ५२ चेंडूत शतक पूर्ण करून सर्वात जलद युवा एकदिवसीय शतकाचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या कामरान गुलामच्या नावावर होता. गुलामने २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध ५३ चेंडूत ही कामगिरी केली होती. भारतीय खेळाडूंमध्ये हा विक्रम राज अंगद बावाच्या नावावर होता, त्याने २०२२ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषकात युगांडाविरुद्ध ६९ चेंडूत शतक झळकावले होते.