Vaibhav Suryavanshi 
स्पोर्ट्स

Vaibhav Suryavanshi : आयपीएल 2026 पूर्वी वैभव सूर्यवंशीचे 'रुद्ररूप', अवघ्या 14 चेंडूत ठोकले अर्धशतक; चौकार-षटकारांचा पाऊस

DY Patil T20 Tournament : ३३१ च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा

रणजित गायकवाड

मुंबई : भारतीय क्रिकेटचा उगवता तारा आणि सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी याने डीवाय पाटील टी-२० स्पर्धेत आपल्या बॅटने पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडला आहे. आयपीएल २०२६ च्या आगामी हंगामापूर्वी वैभवने अत्यंत स्फोटक फलंदाजी करत अवघ्या १४ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावण्याची किमया साधली आहे.

सध्या भारतीय क्रिकेटचे दिग्गज खेळाडू टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये व्यस्त असताना, दुसरीकडे क्रिकेट चाहते आयपीएलच्या १९ व्या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबईत सुरू असलेल्या डीवाय पाटील टी-२० स्पर्धेत अनेक युवा खेळाडू आपल्या कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. 'डीवाय पाटील ब्लू' संघाकडून खेळणाऱ्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने 'इंडियन नेव्ही' विरुद्धच्या सामन्यात आपल्या वादळी खेळीने सर्वांना थक्क केले.

३३१ च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा

इंडियन नेव्ही संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २२० धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी डीवाय पाटील ब्लू संघातर्फे यश धुल आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी मैदानात उतरली. वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत नौदलाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

वैभवने या सामन्यात केवळ १४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने एकूण १९ चेंडूंचा सामना करताना ३३१.५८ च्या स्ट्राईक रेटने ६३ धावा कुटल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ५ उत्तुंग षटकार लगावले. वैभवच्या या आक्रमक सुरुवातीमुळे त्याच्या संघाने हे कठीण लक्ष्य १९.१ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात यशस्वीपणे गाठले.

अर्जुन तेंडुलकरचीही अष्टपैलू चमक

वैभव सूर्यवंशीच्या झंझावातासोबतच या सामन्यात अर्जुन तेंडुलकरनेही आपल्या फलंदाजीने छाप पाडली. अर्जुनने २९ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५५ धावांची नाबाद खेळी साकारली. त्याने शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

आगामी आयपीएल २०२६ चा हंगाम वैभव आणि अर्जुन या दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या स्पर्धेतील त्यांची सध्याची लय पाहता, आयपीएलमध्ये या युवा खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT