जयपूर; वृत्तसंस्था : वैभव सूर्यवंशी... त्याचे वय 14 वर्ष 32 दिवस... खेळण्या-बागडण्याचे दिवस... पण यावेळी तो आयपीएलच्या मैदानात हजारो प्रेक्षकांच्या समोर उभा राहून जगातील मोठमोठे नाव कमवलेल्या गोलंदाजांच्या चिंध्या उडवत होता. मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, करीम जन्नत या सर्वांचा जवळपास बाराशे टी-20 खेळण्याचा अनुभव, पण आपल्या प्रतिभेने सर्वांवर मात करीत वैभव सूर्यवंशीने शतक झळकावले. केवळ 35 चेंडूंत त्याने शतकाला गवसणी घातली. (IPL 2025)
जगातील सर्वात वेगवान शतकाच्या यादीत हे दुसरे शतक ठरले. पहिल्या क्रमांकावर ख्रिस गेल (30 चेेंडू) असून वैभवने युसूफ पठाण (37) याला मागे टाकले. त्यामुळे तो सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू ठरला. याशिवाय आयपीएल इतिहासात सर्वात जलद शतक करणारा दुसराच खेळाडू ठरला आहे. इतकेच नाही, तर तो वरिष्ठ स्तरावरील टी-20 इतिहासात सर्वात कमी वयात शतक करणारा खेळाडू ठरला आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत सोमवारी (28 एप्रिल) सवाई मानसिंग स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात गुजरातने राजस्थानसमोर 210 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले, पण या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानच्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली. त्याने खणखणीत शतक करताना 3 मोठे विक्रम नोंदवले. आयपीएल इतिहासातील सर्वात युवा खेळाडू ठरलेला वैभव सूर्यवंशी सोमवारी राजस्थानकडून यशस्वी जैस्वालसह सलामीस फलंदाजीला उतरला.
चौथ्या षटकात इशांतविरुद्ध तर त्याने तीन षटकार आणि दोन चौकार ठोकले. त्यामुळे त्याने 17 चेंडूंत 3 चौकार आणि 6 षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे त्याने आयपीएल 2025 मध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकले. याआधी निकोलस पूरनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 18 चेंडूंत अर्धशतक केले होते. त्यानंतरही त्याने त्याची गती कमी न होऊ देता शतकही ठोकले. त्याने 10 व्या षटकात करिम जन्नतविरुद्ध 3 चौकार आणि 3 षटकारांसह 30 धावा चोपल्या. त्याने फक्त 35 चेंडूंत 7 चौकार आणि 11 षटकारांसह शतक ठोकले. हे त्याचे पहिलेच शतक आहे. (IPL 2025)
30 चेंडू - ख्रिस गेल, (आरसीबी वि. पुणे वॉरियर्स, 2013)
35 चेंडू - वैभव सूर्यवंशी, (राजस्थान वि. गुजरात, 2025)
37 चेंडू - युसूफ पठाण, (राजस्थान वि. मुंबई इंडियन्स, 2010)
39 चेंडू - डेव्हिड मिलर, (पंजाब किंग्ज वि. आरसीबी,2013)
14 वर्षे 32 दिवस - वैभव सूर्यवंशी (राजस्थान वि. गुजरात, 2025)
18 वर्षे 118 दिवस - विजय झोल (महाराष्ट्र वि. मुंबई, 2013)
18 वर्षे 179 दिवस - परवेझ हुसैन इमॉन (बारिशाल वि. राजशाही, 2020)
18 वर्षे 289 दिवस - गुस्तव मॅककिऑन (फ्रान्स वि. स्वित्झर्लंड, 2022)
14 वर्षे 32 दिवस - वैभव सूर्यवंशी (राजस्थान वि. गुजरात, 2025)
19 वर्षे 253 दिवस - मनीष पांडे (आरसीबी वि. डेक्कन चार्जर्स, 2009)
20 वर्षे 218 दिवस - ऋषभ पंत (दिल्ली वि. हैदराबाद, 2018)