मुंबई : आयपीएल २०२६ च्या हंगामात आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या नाकी नऊ आणणारा राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या मैदानाबाहेरही चांगलाच चर्चेत आला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीपूर्वी वैभवचा एक मजेशीर व्हिडिओ समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत असून, यामध्ये त्याने चक्क आपल्या चिमुकल्या चाहत्यांची फिरकी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षीय स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी या हंगामात सातत्याने मोठ्या खेळी साकारत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो विमानतळावर काही बाल चाहत्यांसोबत गंमत करताना दिसतोय. झाले असे की, काही मुले वैभवसोबत फोटो काढण्यासाठी त्याच्याजवळ आली. मात्र, त्यांना पाहताच वैभवने अत्यंत गंभीर चेहऱ्याने म्हटले, "भाऊ, मी फोटो काढण्याचे पैसे घेतो. खरं सांगतोय मी!"
वैभवचे हे बोलणे ऐकून मुले क्षणभर गोंधळली आणि निराशेने परत जाऊ लागली. मुलांची ही निरागसता पाहून वैभवने त्यांना पुन्हा जवळ बोलावले आणि विचारले, "मी एका फोटोचे १०० रुपये घेतो, पूर्ण देणार असाल तर बोला." त्यावर एका मुलाने तातडीने २०० रुपये देण्याची तयारी दर्शवली. मुलांची ही जिद्द पाहून वैभवला आपले हसू आवरले नाही आणि त्याने हे सर्व केवळ थट्टेने केल्याचे स्पष्ट केले. वैभवचा हा मिश्किल अंदाज पाहून मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले. राजस्थान रॉयल्सने आपल्या अधिकृत 'X' (ट्विटर) हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला असून चाहत्यांकडून यावर पसंतीचा वर्षाव होत आहे.
राजस्थान रॉयल्सने या हंगामाची सुरुवात अत्यंत दिमाखात केली होती. सुरुवातीचे सलग चार सामने जिंकून संघाने आपली पकड मजबूत केली होती. मात्र, हंगामाच्या मध्यावर संघाची कामगिरी काहीशी खालावलेली दिसत आहे. वैयक्तिक स्तरावर वैभव सूर्यवंशीची बॅट तळपत असून त्याने आपल्या फटकेबाजीने संघाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. नुकतेच सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ५७ चेंडूत झंझावाती शतक झळकावत संघाला २२८ धावांच्या विशाल धावसंख्येपर्यंत नेले होते. दुर्दैवाने, त्याच्या या शतकी खेळीनंतरही राजस्थानला ५ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. आता संघाला विजयाच्या मार्गावर परतण्यासाठी सांघिक कामगिरीची आवश्यकता आहे.
राजस्थान रॉयल्सचा पुढील सामना पंजाब किंग्सशी होणार आहे. राजस्थानचा कर्णधार रियान पराग सध्या खराब फॉर्मशी झगडत असून, त्याला या महत्त्वाच्या सामन्यात आपली चुणूक दाखवावी लागणार आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आणि रिकी पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली पंजाब किंग्सचा संघ अत्यंत संतुलित वाटत आहे. मागील हंगामाच्या तुलनेत यंदा पंजाबने प्रभावी पुनरागमन केले असून राजस्थानसमोर त्यांचे तगडे आव्हान असणार आहे. या लढतीत वैभव सूर्यवंशी आपल्या बॅटने पुन्हा एकदा कमाल करणार का, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.