Vaibhav Sooryavanshi world record
मुंबई : राजस्थान रॉयल्सचा रविवारी (दि. २४) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या 'करा किंवा मरो' अशा सामन्यात सर्वांचे लक्ष वेधले होते युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीकडे. चाहत्यांना उत्तुंग षटकार, चौकारांची आतिषबाजीसह त्याच्याकडून अर्धशतक किंवा शतकाची अपेक्षा होती. मात्र वैभव ६ चेंडूत अवघ्या ४ धावावर बाद झाला. मात्र, या निराशाजनक कामगिरीनंतरही सूर्यवंशीने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी यंदाच्या आयपीएल हंगामात वैभव सूर्यवंशीच्या नावावर ५७९ धावा होत्या. रविवारच्या सामन्यात तो अपयशी ठरला. केवळ ४ धावांवर तो बाद झाला. मात्र आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील त्याची एकूण धावसंख्या ५८३ वर पोहोचली.
वैभव सूर्यवंशी हा आता कोणत्याही एका टी-२० स्पर्धेत किंवा मालिकेत सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला युवा खेळाडू ठरला आहे. आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये वैभव जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने १४ सामन्यांत ४१.६४ च्या उत्कृष्ट सरासरीने आणि २३२.२७ च्या थक्क करणाऱ्या स्ट्राईक रेटने ५८३ धावा ठोकल्या आहेत. या मोसमात त्याच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतकेही आहेत.
वैभवने सूर्यवंशीने देवदत्त पडिक्कलचा विक्रम मोडीत काढला आहे. देवदत्तने २०१९/२० च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान कर्नाटककडून खेळताना एका हंगामात ५८० धावा केल्या होत्या.
राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा ३० धावांनी पराभव करत १६ गुणांसह प्लेऑफमधील चौथे आणि अंतिम स्थान निश्चित केले आहे.राजस्थानच्या या विजयामुळे पंजाब किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. आता २७ मे रोजी होणाऱ्या 'एलिमिनेटर' सामन्यात राजस्थानचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल, तेव्हा पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा सूर्यवंशीवर असतील.