Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy : चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पूर्व विभागाचा १५ वर्षीय युवा उपकर्णधार वैभव सूर्यवंशी याने आपल्या फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, डावाच्या सुरुवातीलाच आक्रमक पवित्र्यात दिसलेला वैभव अवघ्या ४४ धावांवर आपली विकेट गमावून बसला. दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्माने केलेल्या स्लेजिंगच्या जाळ्यात अडकून वैभवने विकेट गमावली.
नाणेफेक जिंकून पूर्व विभागाचा कर्णधार इशान किशनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डावाची सुरुवात करताना वैभव सूर्यवंशी आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी दक्षिण विभागाच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्ला चढवला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल १०० धावांची खणखणीत भागीदारी रचली.
वैभवने भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वेगाची दहशत झुगारली. डावाच्या सुरुवातीलाच त्याने सिराजच्या एकाच षटकात दोन चौकार आणि एक षटकार ठोकत त्याला बॅकफूटवर ढकलले. तिलक वर्माच्या बचावात्मक क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा घेत वैभवने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. परिणामी, सिराजला गोलंदाजीतून हटवावे लागले.
धावांची गती रोखण्यासाठी कर्णधार तिलक वर्माने स्वतः रणनीती आखली. स्टंप माईकमध्ये तिलकचे शब्द स्पष्ट ऐकू आले; तो वैभवला चिडवत म्हणाला, "क्या यार ये व्हाइस कॅप्टन?" (काय यार, हा कसला उपकर्णधार?). अर्थात, दोन्ही खेळाडूंमध्ये हे खेळकर वातावरणात घडले असले, तरी त्याचा परिणाम वैभवच्या एकाग्रतेवर झाला. चाम मिलिंदच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात वैभव ४४ धावांवर झेलबाद झाला. उपांत्य फेरीतही मध्य विभागाविरुद्ध ९२ धावांवर बाद झाल्याने त्याचे शतक हुकले होते, तर आता अंतिम सामन्यात त्याचे अर्धशतक अवघ्या ६ धावांनी हुकले.
दुसऱ्या बाजूने अनुभवी फलंदाज अभिमन्यू ईश्वरनने संयमी पण आक्रमक फलंदाजी करत वैभवच्या आधी आपले अर्धशतक पूर्ण केले. आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवड झालेल्या वैभवने पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवून दिली असली, तरी मोक्याच्या क्षणी विकेट फेकून देण्याची त्याची सवय त्याच्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे. या सामन्यासाठी पूर्व विभागाने अंतिम ११ खेळाडूंमध्ये एक बदल केला, तर दक्षिण विभागात मोहम्मद सिराज आणि देवदत्त पडिक्कल यांच्या पुनरागमनासह चार मोठे बदल करण्यात आले आहेत.