स्पोर्ट्स

Vaibhav Sooryavanshi : 15 वर्षांच्या वैभवची ICC क्रमवारीत 'रॉकेट' झेप; टॉप-50 टी-20 फलंदाजांमध्ये धमाकेदार एन्ट्री

ICC T20 Rankings : ईशान किशन ९१० रेटिंग गुणांसह अव्वल स्थानी

रणजित गायकवाड

दुबई : अवघ्या १५ वर्षे वयाचा भारतीय क्रिकेटचा नवा उगवता तारा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीची छाप सोडत आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडवणाऱ्या या युवा खेळाडूला आता आयसीसीच्या ताजी क्रमवारीत याचे मोठे बक्षीस मिळाले आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत वैभवने तब्बल २३० स्थानांची अफाट झेप घेत थेट ४८ वे स्थान पटकावले आहे. क्रमवारीतील ही ऐतिहासिक आणि मोठी झेप म्हणजे जागतिक क्रिकेट वर्तुळ आता या युवा भारतीय फलंदाजाची दखल अत्यंत गांभीर्याने घेऊ लागल्याचे स्पष्ट संकेत मानले जात आहेत.

झिम्बाब्वेविरुद्ध पार पडलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत वैभवने अप्रतिम फलंदाजी करत दोन अर्धशतकांच्या जोरावर एकूण १५१ धावा कुटल्या. या मालिकेत त्याची सरासरी ५०.३३ इतकी उत्कृष्ट राहिली, ज्याच्या बळावर भारताने झिम्बाब्वेचा ३-० असा धुव्वा उडवत मालिका खिशात घातली. या तुफानी कामगिरीच्या जोरावर आयसीसी क्रमवारीत वैभवचे रेटिंग गुण आता ५३६ वर पोहोचले आहेत.

सध्याच्या घडीला वैभव भारतीय फलंदाजांमध्ये सर्वोच्च स्थानी नसला, तरी त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अत्यंत वेगवान आणि प्रभावीपणे पुढे सरकत आहे. टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ईशान किशन ९१० रेटिंग गुणांसह अद्यापही अग्रस्थानी कायम आहे. तर दुसरीकडे तिलक वर्माने दोन स्थानांची सुधारणा करत सहावे स्थान गाठले आहे आणि कर्णधार श्रेयस अय्यरने ७ स्थानांची झेप घेत २४ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

दरम्यान, एकदिवसीय (वनडे) क्रिकेटमधूनही भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलला मागे टाकत आयसीसी वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. डॅरिल मिचेल चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून या स्थानावर विराजमान होता.

गोलंदाजांच्या कामगिरीचा विचार करता, भारताचा लेग-स्पिनर रवी बिश्नोईने ३१ स्थानांची मोठी प्रगती करत ४१ वे स्थान गाठले आहे. दुसरीकडे, दुखापतीमुळे झिम्बाब्वे दौऱ्याला मुकावे लागलेला फिरकीपटू वरुण चक्रवर्ती तीन स्थानांनी खाली घसरला असला, तरी त्याने अजूनही अव्वल १० गोलंदाजांच्या यादीत आपले स्थान टिकवून ठेवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT