David Warner on Sandpapergate : "काही गोष्टी क्रिकेटपेक्षाही मोठ्या असतात. हा विषय जुन्या जखमा पुन्हा उकरून काढण्याचा नाही, तर काही वेदना काळाच्या ओघातही कधी पूर्णपणे भरूनच आल्या नाहीत, हे प्रामाणिकपणे मान्य करण्याचा आहे," अशा शब्दांमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याने उस्मान ख्वाजाच्या 'सँडपेपरगेट' प्रकरणातील खुलाशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील बहुचर्चित 'सॅण्डपेपरगेट' (बॉल-टॅम्परिंग) प्रकरणावर उस्मान ख्वाजाने पुन्हा एकदा मोठा प्रकाश टाकला आहे. त्याच्या 'सब्र' (Sabr) या आत्मचरित्रामध्ये या वादावर अनेक खळबळजनक दावे करण्यात आले असून, त्याबद्दलच्या मीडिया रिपोर्ट्सवर ख्वाजाने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आत्मचरित्रामध्ये ख्वाजाने दावा केला आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सामूहिक जबाबदारी संपूर्ण संघाने घ्यावी, अशी आपली कल्पना होती; मात्र दोन खेळाडूंनी या कल्पनेला तीव्र विरोध दर्शवला होता. २०१८ मधील दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातही सॅण्डपेपरचा वापर करण्यात आला होता आणि दौऱ्यावर असलेल्या संघातील प्रत्येक सदस्याला या योजनेची पूर्ण माहिती होती, असा दावाही त्याने केला आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये डेव्हिड वॉर्नरने म्हटले आहे की, मी उस्मान ख्वाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. स्वतःचे सत्य जगासमोर मांडण्यासाठी प्रचंड धैर्याची गरज असते; विशेषतः जेव्हा यंत्रणा किंवा लोकांना तुम्ही कायम गप्प राहावे असे वाटते, तेव्हा ही कसोटी आणखी बिकट होते.
काळ लोटला म्हणजे घडलेल्या प्रकारची जबाबदारी संपत नाही. जुन्या प्रश्नांचा जाब विचारणे म्हणजे मनात कोणताही राग किंवा द्वेष बाळगणे नव्हे, हा गैरसमज अनेकांनी दूर केला पाहिजे. आदर, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी यापलीकडे कोणतीही व्यक्ती जगाकडे अधिक काहीही मागितली नाही, असेही वॉर्नरने म्हटले आहे.
ख्वाजाच्या दाव्यांमुळे क्रिकेट जगतामध्ये खळबळ उडाली आहे. रविवार सकाळी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ख्वाजा म्हणाला, "बरं, आता काही गोष्टी स्पष्ट करण्याची वेळ आली आहे. तुम्ही माझा लेख वाचला असेल, तर तुम्हाला समजेल की जेव्हा मी 'आपण सगळे' असा उल्लेख केला, तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा होता की आपल्याला आवडले किंवा नाही, पण जे काही घडले त्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. संघ म्हणून आपण सर्वांनी ती सामूहिकपणे स्वीकारली पाहिजे. इतकेच माझे म्हणणे होते."