लंडन; वृत्तसंस्था : क्रिकेटच्या इतिहासात अभूतपूर्व कामगिरी घडवत अफगाणिस्तानच्या उस्मान घनीने टी-10 क्रिकेटमध्ये अनेक नवे विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत. इंग्लंडमध्ये झालेल्या ईसीएस टी-10 लीगमधील लंडन कौंटी विरुद्ध गिल्डफोर्ड सामन्यात घनीने केवळ 28 चेंडूंत शतक झळकावत 43 चेंडूंत नाबाद 153 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 17 टोलेजंग षटकार आणि 11 सणसणीत चौकारांची आतषबाजी केली. पण, याही शिवाय महत्त्वाचा ठरला तो त्याचा एकाच षटकातील 45 धावांचा विश्वविक्रम!
आजवर एकाच षटकात 6 षटकारांचे विश्वविक्रम आपण पाहिले आहेत. यासह षटकात कमाल 36 धावा होऊ शकतात. मात्र, घनीने विल अर्नीच्या एका षटकात तब्बल 45 धावा काढून एकाच षटकातील सर्वाधिक धावांचा जागतिक विक्रम केला. या षटकात 5 षटकार, 3 चौकार, 2 नो-बॉल (एकावर षटकार, एकावर चौकार) आणि 2 वाईड अशा 8 चेंडूंवर धावा जमल्या. याआधी कोणत्याही व्यावसायिक क्रिकेटमध्ये एका षटकात इतक्या धावा झाल्या नव्हत्या.
घनीच्या या तुफानी खेळीमुळे लंडन कौंटीने 10 षटकांत बिनबाद 226 अशी विक्रमी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात गिल्डफोर्ड संघाने 10 षटकांत 4 बाद 155 धावांपर्यंत मजल मारली आणि ते 71 धावांनी पराभूत झाले. या ऐतिहासिक खेळीमुळे उस्मान घनीचे नाव जागतिक क्रिकेटमध्ये नव्या उंचीवर पोहोचले असून, क्रिकेटप्रेमींमध्ये या विक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.