स्पोर्ट्स

US Open 2026 : मॉनफिल्‍सचा पिछाडीवरून रोमांचक विजय अमेरिकन ग्रँडस्‍लॅममध्‍ये सामना जिंकणारा सर्वात वयस्‍कर टेनिसपटू

झ्वेरेव्हनेही जिंकला मॅरेथॉन थरार; महिला गटात रिबाकिना-गॉफची आगेकूच

रणजित गायकवाड

न्यूयॉर्क : कोर्टवरील चित्तथरारक खेळासाठी ओळखल्‍या जाणार्‍या फ्रान्सच्या अनुभवी गेल मॉनफिल्सने आपल्या ४० व्या वाढदिवशी संस्मरणीय विजयाची नोंद केली. यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत पहिला सेट गमावल्यानंतरही मॉनफिल्सने जोरदार पुनरागमन करत पॅराग्वेच्या अडोल्फो डॅनिएल व्हॅलेहोचा २-६, ६-१, ६-२, ६-० असा धुव्वा उडवला. या विजयासह मॉनफिल्सने जिमी कॉनर्सच्या (१९९२) ऐतिहासिक विक्रमाशी बरोबरी करत यूएस ओपनमध्ये सामना जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू होण्याचा मान मिळवला.

या मोसमाअखेर निवृत्तीचे संकेत देणाऱ्या मॉनफिल्सने पहिल्या सेटमधील पराभवानंतर आपल्या खेळात आक्रमकता आणली. चौथ्या सेटमध्ये १-० अशा आघाडीवर असताना त्याने हवेत उडी घेत मारलेल्या ‘फोरहँड विनर’ने लुईस आर्मस्ट्राँग स्टेडियममधील प्रेक्षकांना थक्क केले. विजयानंतर मैदानातच प्रेक्षकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा गाऊन दिल्या. मॉनफिल्सने याआधीच त्याची पत्नी एलिना स्वितोलिनाच्या साथीने मिश्र दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. एकेरीच्या दुसऱ्या फेरीत त्याचा सामना अमेरिकेच्या १४ व्या मानांकित लर्नर टिएनशी होईल.

झ्वेरेव्हला पाच तास झुंजवले; सोनेगोचा निसटता पराभव

पुरुषांच्या अन्य एका थरारक लढतीत अव्वल मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हला पहिल्या फेरीत अनपेक्षित कडव्या संघर्षाला सामोरे जावे लागले. इटलीच्या लोरेन्झो सोनेगोने झ्वेरेव्हला अक्षरशः घाम गाळायला लावला. जवळपास पाच तास आणि मध्यरात्रीनंतर चाललेल्या या मॅरेथॉन सामन्यात झ्वेरेव्हने ६-४, ३-६, ६-७(७), ७-५, ६-४ असा निसटता विजय साकारला. दुसऱ्या फेरीत झ्वेरेव्हसमोर फ्रान्सच्या क्विंटिन हॅलिसचे आव्हान असेल.

कोको गॉफची सहज सलामी

महिला एकेरीत स्थानिक टेनिसप्रेमींची लाडकी आणि माजी विजेती कोको गॉफने आपल्या मोहिमेची दिमाखदार सुरुवात केली. नुकतेच सिनसिनाटी ओपन जिंकणाऱ्या २२ वर्षीय गॉफने तुर्कस्तानच्या झेनेप सोन्मेझचा ६-३, ६-४ असा सरळ सेटस्‌मध्ये पराभव करून सहज आगेकूच केली.

चौकट

‘किंग रिचर्ड’ चित्रपटातील ‘सेरेना’चे ग्रँडस्लॅममध्ये पदार्पण

महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत दुसऱ्या मानांकित एलेना रिबाकिनाने अमेरिकेच्या १७ वर्षीय थिया फ्रॉडिनचा ६-३, ६-२ असा पराभव केला खरा; पण या सामन्यात सर्वांचे लक्ष फ्रॉडिनने वेधून घेतले. फ्रॉडिन ही टेनिस विश्वात येण्यापूर्वी २०२१ मधील प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपट ‘किंग रिचर्ड’मध्ये बालकलाकार डेमी सिंगलटनची ‘बॉडी डबल’ म्हणून काम करत होती. कॅलिफोर्नियातील १० वर्षांखालील गटात एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीचे जेतेपद जिंकल्यानंतर थियाची या भूमिकेसाठी निवड झाली होती आणि तिने सहा महिने चित्रपटाच्या सेटवर घालवले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT