US chess grandmaster Daniel Naroditsky dies at age 29
अमेरिकेच्या बुद्धीबळ क्षेत्राला एक मोठा धक्का बसला आहे. आपल्या अफाट प्रतिभेने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणारा, ‘बाल बुद्धिमत्ता’ (चाइल्ड प्रॉडिजी) म्हणून उदयास आलेला आणि डिजिटल युगातील बुद्धीबळाचा आवाज बनलेला ग्रँडमास्टर डॅनियल नरोडित्स्की याचे सोमवारी दुःखद निधन झाले. नियतीने त्याला अवघ्या २९ व्या वर्षी हिरावून घेतले, ज्यामुळे बुद्धीबळ जगतात एक पोकळी निर्माण झाली झाल्याची भावना व्यक्त होत आहे. नरोडित्स्की याच्या निधनाचे कारण समजू शकलेले नाही.
डॅनियलच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांवर आणि बुद्धीबळ समुदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे कुटुंब गहिऱ्या शोकात बुडाले आहे. शार्लोट बुद्धीबळ केंद्राने सामायिक केलेल्या निवेदनात कुटुंबाने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘डॅनियलचे बुद्धीबळाच्या खेळावर असलेले अतूट प्रेम आणि निष्ठा, तसेच त्याने आम्हा सर्वांना दररोज दिलेला निर्मळ आनंद आणि प्रेरणा... या सुंदर आठवणींसाठी आपण त्याला कायम स्मरणात ठेवूया.’
नरोडित्स्कीने १२ वर्षांखालील जागतिक विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी ग्रँडमास्टर हा किताब पटकावला, जो जागतिक बुद्धीबळ क्षेत्रातील सर्वात मोठा सन्मान आहे. कॅलिफोर्नियात जन्मलेल्या या खेळाडूने पौगंडावस्थेत असतानाच बुद्धीबळाच्या रणनीतीवर पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली आणि जागतिक क्रमवारीतील आपले स्थान उंचावले.
युक्रेन आणि अझरबैजानमधून स्थलांतरित झालेल्या ज्यू पालकांच्या पोटी जन्मलेल्या नरोडित्स्कीने बुद्धीबळ विश्वात अद्वितीय कामगिरी केली. कॅलिफोर्नियातील सॅन माटेओ काउंटी येथे त्याचे बालपण गेले. अवघ्या १४ व्या वर्षी त्याने आपले पहिले बुद्धीबळातील रणनीतीविषयक पुस्तक ‘मास्टरिंग पोझिशनल चेस’ प्रकाशित केले. या महत्त्वपूर्ण कार्यामुळे तो जगातील सर्वात तरुण बुद्धीबळ लेखकांपैकी एक म्हणून गणला जाऊ लागला.
पारंपरिक बुद्धीबळ प्रकारात त्याने सातत्याने जागतिक टॉप २०० खेळाडूंमध्ये आपले स्थान पक्के केले होते. तसेच, त्याने ब्लिट्झ चेस नावाच्या जलदगती प्रकारातही उत्कृष्ट कामगिरी केली आणि टॉप २५ मध्ये स्थान राखले होते. नरोडित्स्कीने नुकतीच ऑगस्टमध्ये यू.एस. राष्ट्रीय ब्लिट्झ चॅम्पियनशिप जिंकली होती.
२०२१ मध्ये, त्याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या आणि अमेरिकेचा तत्कालीन विजेते फॅबियानो कारुआना याचा पराभव करून आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठी कामगिरी नोंदवली होती.
नरोडित्स्कीने लाइव्हस्ट्रीम आणि ऑनलाईन शिकवणीतून शेकडो वर्षांच्या या खेळाला डिजिटल युगात आणले. YouTube आणि Twitch यांसारख्या प्लॅटफॉर्मवर हजारो चाहते त्यांचे शैक्षणिक व्हिडिओ पाहत असत, ज्यामुळे नरोडित्स्की याला आधुनिक बुद्धीबळातील सर्वात प्रभावी व्यक्ती मानले जाते. त्याचे समकालीन ग्रँडमास्टर देखील नरोडित्स्की याच्या लाइव्हस्ट्रीमिंग आणि समालोचनाद्वारे या खेळाला अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय देतात.