स्पोर्ट्स

USA vs IRE : पाऊस आला धावून; पाकिस्तान गेले वाहून

Arun Patil

प्लोरिडा, वृत्तसंस्था : टी-20 वर्ल्डकपमधील पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले. शुक्रवारी अमेरिका आणि आयर्लंड (USA vs IRE) यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना प्रत्येकी एकेक गुण देण्यात आला. त्यामुळे 5 गुण घेवून अमेरिकेने सुपर-8 फेरी पक्की केली. याआधी फक्त 3 पैकी फक्त एक सामना जिंकलेल्या पाकिस्तानने त्यांचा पुढील सामना जिंकला तरी ते चार गुणांवरच राहतील. त्यामुळे टी-20 वर्ल्डकपमधून पाकिस्तानने अधिकृतपणे गाशा गुंडाळला आहे. आपला पहिलाच वर्ल्डकप खेळणार्‍या अमेरिकेने ऐतिहासिक कामगिरी करीत सुपर-8 फेरी गाठली, शिवाय 2026 च्या वर्ल्डकपची पात्रताही मिळवली. म्हणजे त्यांना आता त्यासाठी पात्रता फेरी खेळावी लागणार नाही.

अ गटातून भारताने सुपर 8 मधील जागा पक्की केली आहे तर दुसर्‍या स्थानासाठी यजमान अमेरिका 4 गुणांसह आघाडीवर होती. पाकिस्तान (2) व कॅनडा (2) यांनाही संधी होती. फ्लोरिडामध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. येथील दोन्ही संघांच्या शेवटच्या साखळी सामन्यावर पावसाचे सावट होते. अमेरिकेच्या लढतीत पावसाची शक्यता वर्तवली होती, त्याप्रमाणे अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यातही पाऊस धावूनआला आणि यात पाकिस्तान वाहून गेला.

पाकिस्तानला स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अमेरिकेकडून सुपर ओव्हरमध्ये लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध त्यांनी नांग्या टाकल्या. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या पोटातून विजयाचा घास खेचून आणला आणि त्यानंतर पाकिस्तानचे स्थान डळमळीत झाले. तिसर्‍या सामन्यात कॅनडावर विजय मिळवल्याने आणि भारताने अमेरिकेला हरवल्याने पाकिस्तान शर्यतीत कायम राहिला होता, परंतु शुक्रवारच्या सामन्यातील निकालावर त्यांचे भविष्य अवलंबून होते.

10 वाजेपर्यंत खेळपट्टीची पाहणीच सुरू होती आणि रेफरींनी 11.46 वाजता मॅच सुरू होणार असल्याचे जाहीर केले. पावसामुळे विलंब झाल्याने ही लढत 5-5 षटकांची खेळवण्यात येणार होता. 11 वाजता खेळपट्टीची पाहणी करताना काही मैदानावरील काही ओल्या पृष्ठभागावर सामनाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. तितक्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाले आणि वीजांचा कडकडाटही झाला. त्यामुळे पुन्हा खेळपट्टी झाकण्यात आली. पुन्हा जोरदार पाऊस आला. सामनाधिकारी जवागल श्रीनाथने सामना रद्द झाल्याचे जाहीर केले आणि पाकिस्तानचे पॅकअप पक्के झाले.

SCROLL FOR NEXT