स्पोर्ट्स

Women's Euro 2025 : ‘युरो’च्या सिंहासनासाठी महासंग्राम! इंग्लंडसमोर विश्वविजेत्या स्पेनचे कडवे आव्हान

विश्वचषक फायनलची पुनरावृत्ती : स्पेन प्रथमच अंतिम फेरीत; इंग्लंडसमोर जेतेपद राखण्याचे आव्हान

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : महिला युरो कप 2025 च्या अंतिम सामन्याची प्रतीक्षा आता संपली असून, विजेतेपदासाठी दोन बलाढ्य संघ निश्चित झाले आहेत. रविवार, 27 जुलै रोजी स्वित्झर्लंडच्या बासेल शहरात होणार्‍या या महामुकाबल्यात गतविजेत्या इंग्लंडचा सामना पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पेनशी होणार आहे. हा सामना 2023 च्या महिला विश्वचषक अंतिम सामन्याची पुनरावृत्ती असल्याने फुटबॉल चाहत्यांच्या नजरा या लढतीकडे लागल्या आहेत.

उपांत्य फेरीत स्पेनने बलाढ्य जर्मनीवर 1-0 ने मात करत ऐतिहासिक विजय मिळवला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करता न आल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला. तेव्हा दोन वेळची बॅलन डी’ओर विजेती ऐताना बोनमाटी स्पेनसाठी धावून आली. तिने 113 व्या मिनिटाला निर्णायक गोल करत संघाला प्रथमच युरो कपच्या अंतिम फेरीत पोहोचवले. विशेष म्हणजे, स्पर्धेपूर्वी काही दिवस बोनमाटी व्हायरल मेंदुज्वरामुळे रुग्णालयात दाखल होती; पण तिने मैदानावर परतत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

दुसरीकडे, ‘लायनेसेस’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या इंग्लंडच्या संघाने उपांत्य फेरीत इटलीचा 2-1 ने पराभव करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. कर्णधार लिया विल्यमसनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ सलग दुसर्‍यांदा युरो कप जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. इंग्लंडसाठी संपूर्ण स्पर्धेत फॉरवर्ड बेथ मीड आणि एला टूने यांनी धारदार आक्रमण केले आहे, तर गोलकीपर मेरी अर्प्सने अभेद्य बचाव करत संघाला विजय मिळवून दिले आहेत.

स्पेनची विजेतेपदाच्या हॅट्ट्रिकवर नजर

स्पेनचा संघ गेल्या दोन वर्षांपासून तुफान फॉर्मात आहे. त्यांनी 2023 मध्ये विश्वचषक आणि त्यानंतर नेशन्स कप जिंकला आहे. आता युरो कप जिंकून विजेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याचा त्यांचा मानस असेल. तर इंग्लंड विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढून आपले ‘युरो’वरील वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे हा अंतिम सामना केवळ एक स्पर्धा नव्हे, तर दोन कट्टर प्रतिस्पर्धकांमधील प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे.

युरो कप फायनल :

  • रविवार, दि. 27 जुलै

  • स्थळ : बासेल पार्क,

  • वेळ : रात्री 9.30 वा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT