दुबई : उपकर्णधार विहान मल्होत्रा आणि ॲरॉन जॉर्ज यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने अंडर-19 आशिया चषक 2025 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रीलंकेचा 8 विकेटस्ने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. 45 चेंडूंमध्ये नाबाद 61 धावांची खेळी करणारा विहान मल्होत्रा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या स्पर्धेत भारताने आठव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. आता भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत रविवार, दि. 21 डिसेंबर रोजी अंतिम सामना रंगणार आहे.
पावसामुळे हा उपांत्य सामना प्रत्येकी 20 षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला भारतीय गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत 20 षटकांत 8 बाद 138 धावसंख्येवर रोखले. 139 धावांचे लक्ष्य गाठताना भारताने 18 षटकांत 2 विकेटस्च्या मोबदल्यात सहज विजय मिळवला.
डावखुरा फलंदाज विहान मल्होत्रा याने 45 चेंडूंमध्ये नाबाद 61 धावा करत आक्रमक फलंदाजी केली. त्याने दोन षटकारांसह आकर्षक फटके खेळले. त्याला ॲरॉन जॉर्ज याची भक्कम साथ लाभली. जॉर्जने 49 चेंडूंमध्ये नाबाद 58 धावा करत संयमी आणि तांत्रिकदृष्ट्या उत्तम खेळी साकारली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 114 धावांची नाबाद भागीदारी करत भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.
सुरुवातीला दोन धक्के भारताला धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवातीला अडचणी आल्या. आयुष म्हात्रे (7) आणि वैभव सूर्यवंशी (9) हे दोघेही वेगवान गोलंदाज रासिथ निमसारा याच्या माऱ्यात बाद झाले. मात्र, त्यानंतर मल्होत्रा आणि जॉर्ज यांनी डाव सावरत विजयाकडे नेला.
प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या भारताने सुरुवातीच्या सहा षटकांतच श्रीलंकेची अवस्था 3 बाद 28 अशी केली. श्रीलंकेकडून विमथ दिनसारा (32) आणि चामिका हिनाटिगला (42) यांनी काहीसा प्रतिकार केला, तर सेथमिक सेनेविरत्ने याने 22 चेंडूंमध्ये 30 धावांची खेळी करत संघाला 135 धावांचा टप्पा ओलांडून दिला. भारताकडून कनिष्क चौहान आणि हेनिल पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या.
दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने बांगला देशवर 8 विकेटस्ने विजय मिळवला. त्यामुळे 11 वर्षांनंतर अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. 2014 मध्ये झालेल्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानला हरवले होते. त्या संघात श्रेयस अय्यर, सर्फराज खान, संजू सॅमसन आणि कुलदीप यादव यांचा समावेश होता.
श्रीलंका : विरन चमुदिथा झे. सिंग गो. दिपेश 19, दुलनिथ सिगेरा झे. दिपेश गो. सिंग 1, विमथ दिन्सारा झे. सिंग गो. चौहान 32, कविजा गमेगे धावबाद (वेदांत त्रिवेदी) 2, चमिका हीनतिगालाझे. चौहान गो. हेनिल पटेल 42, किथमा विठानापथिरना झे. खिलन पटेल गो. चौहान 7, आधम हिल्मी झे. वेदांत त्रिवेदी गो. खिलन पटेल 1, सेथमिका सेनेविरत्ने झे. आणि गो. हेनिल पटेल 30, सनुजा निंदुवारा नाबाद 0. एकूण : 8 बाद 138 (अवांतर 4), गोलंदाजी (भारत) : कनिष्क चौहान 36/2, हेनिल पटेल 31/2 , दीपेश देवेंद्रन 25/1 किशन सिंग 20/1, खिलन पटेल 25/1.
भारत : आयुष म्हात्रे झे. निंदुवारा गो. निमसारा 7, वैभव सूर्यवंशी झे. दिन्सारा गो. निमसारा 9, एरन जॉर्ज नाबाद 58, विहान मल्होत्रा नाबाद 61, एकूण 2 बाद 139, अवांतर 4. गोलंदाजी : रसिथ निमसारा 31/2, विरन चमुदिथा 20/0, विग्नेस्वरन आकाश 23/0. सामन्याचा निकाल : भारत अंडर 19 संघ 8 गडी राखून विजयी. सामनावीर : विहान मल्होत्रा (नाबाद 61 धावा).
अंतिम सामना : भारत विरुद्ध पाकिस्तान (रविवार 21 डिसेंबर).