ओमानः वृत्तसंस्था
ओमानमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील आशिया चषक (२०२६) स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत माजी विजेता भारतासमोर अफगाणिस्तानचे आव्हान आहे. गटवार साखळी फेरीत अपेक्षित कामगिरी न झाल्याने ओमानमधील अल अमिरात क्रिकेट ग्राउंडवर (मिनिस्ट्री टर्फ १) खेळल्या जाणाऱ्या सेमी फायनलच्या दुसऱ्या सामन्यात लक्ष्य रायचंदानी आणि कंपनीचा कस लागेल.
भारताने अ गटामधून ३ पैकी २ सामने जिंकून दुसरे स्थान मिळवत आगेकूच पाकिस्तानविरुद्धच्या केली. पराभवाचा अपवाद वगळता नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) संघाला हरवून अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवले. भारताची कामगिरी संमिश्र राहिली आहे. तीन सामन्यांत दोन शतके आणि तीन अर्धशतकांची नोंद झाली आहे. सलामीवीर आर्यवीर सेहवागने फलंदाजीची धुरा सांभाळली आहे. तीन सामन्यांत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावून त्याने १२६ च्या सरासरीने सर्वाधिक २५२ धावा फटकावल्या आहेत.
त्यात यूएईविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यातील १६० धावांच्या तुफानी खेळीचा समावेश आहे. त्याच्यानंतर केवळ अष्टपैलू अर्जुन राजपूतला शतक झळकावता आले आहे. विनीत आणि कॅप्टन रायचंदानीने एकेक हाफसेंच्युरी मारत फलंदाजीमध्ये थोडे योगदान दिले आहे. मात्र, फलंदाजी उंचावण्यासाठी सर्वच प्रमुख खेळाडूंनी आपापल्या परीने योगदान देण्याची गरज आहे.
मध्यमगती गोलंदाज ईशान सूदने (८ विकेट) प्रभावी गोलंदाजी केली आहे. अर्जुन राजपूत (४ विकेट) आणि डावखुरा फिरकीपटू मनल चौहानने (५ विकेट) वगळता त्याला अन्य गोलंदाजांची अपेक्षित साथ लाभलेली नाही.
दुसरीकडे, अफगाणिस्तान संघ चांगलाच फॉर्मात आहे. अफगाणिस्तानने आपले तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकत ब गटात अव्वल स्थान पटकावले. त्यांनी बांगलादेशचा ११३ धावांनी धुव्वा उडवला. मलेशियाला १० विकेटनी हरवले तर श्रीलंकेवर १०६ धावांनी विजय साकारला. अफगाणिस्तानची वैयक्तिक कामगिरी चांगली नसली तरी सांघिक कामगिरीच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवला आहे. सुभान झाखाइल, फैसल रहिमी आणि अब्दुल्ला नादरजनने फलंदाजीमध्ये छाप पाडली आहे. मध्यमगती गोलंदाज नूर अलीने १३ विकेट घेत गोलंदाजीची धुरा समर्थपणे पेलली आहे.
आर्यवीर सेहवागवर फलंदाजीची धुरा
सलामीवीर आर्यवीर सेहवागने फलंदाजीची धुरा सांभाळली आहे. तीन सामन्यांत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावून त्याने १२६ च्या सरासरीने सर्वाधिक २५२ धावा फटकावल्या आहेत. त्यात यूएईविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यातील १६० धावांच्या तुफानी खेळीचा समावेश आहे.
पाकिस्तान-बांगलादेश आमनेसामने
पहिल्या सेमीफायनलमध्ये गतविजेता पाकिस्तान आणि बांगलादेश आमनेसामने आहेत. पाकिस्तानने यूएईसह भारत आणि नेपाळला पराभत करून अ गटात वर्चस्व राखले. बांगलादेशने दोन सामने जिंकत आगेकूच केली. चांगला सूर गवसलेल्या पाकिस्तानला रोखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.