Vaibhav Sooryavanshi India vs Pakistan U19 Asia Cup 2025
नवी दिल्ली: रविवारी पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यादरम्यान भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला एका कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानने भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावल्यानंतर, स्टेडियमच्या बाहेर काही पाकिस्तानी चाहत्यांनी वैभव सूर्यवंशीची समोरून जात असताना खिल्ली उडवली.
या अपमानाकडे दुर्लक्ष करत सूर्यवंशीने कमालीचा संयम दाखवला. त्याने कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे तेथून निघून जाणे पसंत केले. दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर रंगलेल्या या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने होते. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ३४७ धावांचा डोंगर उभा केला. समीर मिन्हासने अवघ्या ११३ चेंडूत १७२ धावांची तुफानी खेळी केली. भारतासमोर हे लक्ष्य गाठणे सुरुवातीपासूनच कठीण वाटत होते.
भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर आयुष म्हात्रे अवघ्या दोन धावांवर बाद झाला. संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. वैभवने आत्मविश्वासाने सुरुवात केली आणि पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने अवघ्या ९ चेंडूत २६ धावा केल्या, ज्यामुळे भारतीय चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, या आक्रमक सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करण्यात तो अपयशी ठरला. वेगवान गोलंदाज अली रझाच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि वैभव बाद झाला. बाद झाल्यानंतर वैभव आणि अली रझा यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचेही पाहायला मिळाले.
भारताचा डाव पत्त्यासारखा कोसळला आणि अखेर २६.२ षटकांत १५६ धावांवर संपूर्ण संघ बाद झाला. भारताला १९१ धावांनी मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम सामन्यातील पराभव निराशाजनक असला तरी, संपूर्ण स्पर्धेत वैभवने दमदार कामगिरी केली आहे.
त्याने आशिया चषकाची सुरुवात यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा करून केली होती. त्यानंतर मलेशियाविरुद्ध अर्धशतक झळकावले. मात्र, श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्धच्या बाद फेरीच्या सामन्यात त्याची बॅट तळपली नाही. वैभवने पाच डावात एकूण २६१ धावा केल्या. त्याने ५२.२० च्या सरासरीने आणि १८२.५२ च्या स्ट्राइक रेटने ही धावसंख्या उभारली.