U19 Asia Cup 2025 | रविवारचा 'सुपर संडे'! भारत-पाक यांच्यात फायनल 'वॉर'; कोण मारणार बाजी? File Photo
स्पोर्ट्स

U19 Asia Cup 2025 | रविवारचा 'सुपर संडे'! भारत-पाक यांच्यात फायनल 'वॉर'; कोण मारणार बाजी?

दुबईत रंगणार महामुकाबला; टीम इंडिया 12 व्या विजेतेपदासाठी सज्ज

पुढारी वृत्तसेवा

दुबई; वृत्तसंस्था : क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा रविवारचा दिवस अतिशय खास असणार आहे. 19 वर्षांखालील आशिया चषक 2025 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. दुबईतील आयसीसी अकादमीच्या मैदानावर हा हायव्होल्टेज महामुकाबला खेळवला जाईल. साखळी फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानला हरवले होते. त्यामुळे या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे पारडे अपेक्षेप्रमाणे जड असणार आहे.

आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंतचे सर्व सामने जिंकत अजिंक्य राहिला आहे. साखळी फेरीत भारताने पाकिस्तानचा 90 धावांनी धुव्वा उडवला होता. भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेला 8 गडी राखून नमवत अंतिम फेरीत धडक मारली आहे, तर पाकिस्तानने गतविजेत्या बांगला देशचा पराभव करून फायनलचे तिकीट मिळवले आहे. अंतिम सामन्यात भारताची मदार प्रामुख्याने मलेशियाविरुद्ध द्विशतक झळकविणार्‍या यष्टिरक्षक फलंदाज अभिज्ञान कुंडू स्फोटक सलामीवीर वैभव सूर्यवंशी, गोलंदाज दीपेश देवेंद्रन, अष्टपैलू कनिष्क चौहान यांच्यावर आहे.

विक्रमी 12 व्या जेतेपदाचे लक्ष्य

भारताने आतापर्यंत या स्पर्धेत 8 वेळा जेतेपद पटकावले आहे (एकूण 11 स्पर्धांमध्ये भारताचे वर्चस्व राहिले आहे). आजचा सामना जिंकल्यास भारत विक्रमी 12 व्या वेळेस (काही वेळा संयुक्त जेतेपदासह) आशिया चषक आपल्या नावावर करेल. पाकिस्तानने केवळ एकदा (2012 मध्ये) हे जेतेपद पटकावले आहे.

पुन्हा नो-हँडशेक!

भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू मागील सामन्यांप्रमाणेच या सामन्यातही नो-हँडशेक (हस्तंदोलन न करण्याचे) धोरण पाळण्याची शक्यता आहे.

भारताचे मॅच विनर्स

अभिज्ञान कुंडू : या 17 वर्षीय यष्टिरक्षक फलंदाजाने मलेशियाविरुद्ध नाबाद 209 धावा कुटून युवा वन डेमधील पहिले द्विशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे.

वैभव सूर्यवंशी : सलामीवीर वैभवने यूएईविरुद्ध 171 धावांची वादळी खेळी केली होती. याआधी देखील त्याने इतर स्पर्धांत आपल्या स्फोटक खेळाने लक्ष वेधले होते.

एरॉन जॉर्ज : मधल्या फळीतील एरॉन जॉर्ज या युवा फलंदाजाने सलग तीन अर्धशतके झळकावून संघाला स्थिरता दिली आहे. अंतिम सामन्यात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

दीपेश देवेंद्रन : 11 बळींसह दीपेश या स्पर्धेत संयुक्तपणे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने पहिल्या सामन्यात 3 बळी घेतले होते.

सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता (नाणेफेक सकाळी 10.00 वाजता).

ठिकाण : आयसीसी अकादमी मैदान, दुबई.

थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्टस् नेटवर्क (टीव्ही) आणि सोनी लिव्ह (ऑनलाईन स्ट्रीमिंग).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT