स्पोर्ट्स

IND vs PAK U19 Asia Cup : भारताचा पाकिस्तानवर 90 धावांनी दणणीत विजय, टीम इंडियाचे सेमीफायनलचे तिकीट 'पक्के'

India U19 vs Pakistan U19 : ‘जॉर्ज’ची ८५ धावांची 'झंझावाती' खेळी

रणजित गायकवाड

अंडर-19 एशिया कप 2025 मध्ये भारतीय युवा खेळाडूंनी आपला दबदबा कायम राखत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 90 धावांनी धुळ चारली आहे. फलंदाजांनी माफक कामगिरी केल्यानंतरही गोलंदाजांनी केलेल्या अभूतपूर्व पलटवारामुळे टीम इंडियाने सलग दुसरा विजय मिळवला आणि सेमीफायनलमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.

फलंदाज अडखळले, पण चौहान आणि दीपेशने बाजी पालटली

पावसामुळे 49-49 षटकांचा करण्यात आलेल्या या सामन्यात, टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 46.1 षटकांत 240 धावांवर सर्वबाद झाला. सलामीवीर वैभव सूर्यवंशी (5) लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रे (38) याने दमदार सुरुवात केली. एक बाजू सांभाळत एरोज जॉर्जने सर्वाधिक 85 धावांची संयमी पण उपयुक्त खेळी केली. मात्र, एका टोकाकडून त्याला फार साथ मिळाली नाही. अखेरीस, कनिष्क चौहानने केलेली 46 धावांची तडफदार खेळी भारतासाठी अत्यंत मोलाची ठरली आणि संघाला 240 पर्यंत पोहोचवण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली.

दीपेश-कनिष्कची 'घातक' जोडी!

241 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच घेरले. किशन कुमार सिंग आणि हेनिल पटेल यांनी भेदक गोलंदाजी करत धावांवर अंकुश ठेवला.

दीपेश देवंद्रनचे वादळ : यानंतर मैदानात आलेल्या दीपेश देवंद्रनने आपल्या पहिल्याच तीन षटकांत तीन विकेट्स काढत पाकिस्तानला संपूर्णपणे बॅकफूटवर ढकलले.

चौहानचा 'ब्रेकथ्रू' : दीपेशनंतर आलेल्या कनिष्क चौहानने आपल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेत पाकिस्तानच्या अडचणी वाढवल्या.

संपूर्ण ढेपाळला पाकिस्तान : पाहता पाहता 30 धावांवर पाकिस्तानचे 4 विकेट्स पडले होते. हुजैफ अहसान (58) आणि कर्णधार फरहान युसूफ यांनी 47 धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण वैभव सूर्यवंशीने फरहानला बाद करत ही जोडी फोडली.

अखेरीस, पाकिस्तानचा संपूर्ण संघ 41.1 षटकांत अवघ्या 150 धावांवर ऑलआऊट झाला. भारताने हा सामना 90 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.

सेमीफायनलचे दार उघडले

या दणदणीत विजयामुळे आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ग्रुप-ए मध्ये पहिले स्थान कायम राखले आहे. भारताने सलग दोन विजय मिळवल्यामुळे त्यांचे सेमीफायनलमधील स्थान आता जवळपास पक्के झाले आहे. भारतीय संघ आपला शेवटचा लीग सामना 16 डिसेंबर रोजी मलेशियाविरुद्ध खेळेल. गोलंदाजांच्या या अविश्वसनीय कामगिरीमुळे भारतीय संघाची सेमीफायनलकडे वाटचाल सोपी झाली असून, आता ट्रॉफी जिंकण्याच्या त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि दमदार खेळाच्या बळावर ९० धावांनी दणदणीत विजय मिळवला.

भारतीय गोलंदाजांनी आजच्या सामन्यात आपला पूर्णपणे दबदबा निर्माण केला. त्यांच्या धारदार माऱ्यापुढे पाकिस्तानच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर तग धरता आला नाही. भारतीय गोलंदाजांच्या भेदक कामगिरीमुळे पाकिस्तानचा संपूर्ण डाव अवघ्या ४१.२ षटकांतच संपुष्टात आला.

किशन कुमार सिंगचा कहर!

गोलंदाज किशन कुमार सिंग जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने संघाला आणखी एक मोठा ब्रेक मिळवून दिला. पाकिस्तानचा अली रजा याला विकेट घेऊन त्याने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. ४१.२ षटकांवर किशन कुमार सिंगने टाकलेला चेंडू अली रजाने फटकावण्याचा प्रयत्न केला, पण तो थेट क्षेत्ररक्षक खिल्लन पटेलच्या हातात विसावला. खिल्लन पटेलने कोणताही धोका न घेता हा सोपा पण महत्त्वाचा झेल पूर्ण केला. अली रजाने ९ चेंडूंमध्ये एका चौकाराच्या मदतीने केवळ ६ धावा केल्या. किशन कुमार सिंगने सलग विकेट्स घेऊन पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले.

किशन कुमारचा अचूक मारा, मोहम्मद सय्यम अवघ्या २ धावांवर बाद

गोलंदाजीमध्ये बदल झाल्यानंतर त्वरित यश मिळाले. गोलंदाज किशन कुमार सिंगने आपल्या स्पेलची सुरुवात धमाकेदार केली आहे. त्याने मोहम्मद सय्यमला स्वस्तात तंबूचा रस्ता दाखवला. ३९.५ व्या षटकात किशन कुमार सिंगने टाकलेला चेंडू मोहम्मद सय्यमच्या बॅटला लागून हवेत उंच उडाला. क्षेत्ररक्षक आयुष म्हात्रेने अत्यंत महत्त्वाचा झेल घेत मोहम्मद सय्यमला केवळ २ धावांवर (७ चेंडू) पॅव्हेलियनमध्ये परतण्यास भाग पाडले.

हुजैफा अहसान ७० धावांवर झेलबाद

गोलंदाज कणिष्क चौहानने आपल्या दुसऱ्या विकेटच्या रूपाने सेट झालेला फलंदाज हुजैफा अहसानला तंबूत पाठवले आहे. ३८.३ व्या षटकांत कणिष्कने टाकलेला चेंडू हुजैफा अहसानने मारण्याचा प्रयत्न केला, पण तो थेट क्षेत्ररक्षक वैभव सूर्यवंशीच्या हातात विसावला. वैभव सूर्यवंशीने अत्यंत महत्त्वाचा झेल घेत संघाला मोठे यश मिळवून दिले. हुजैफा अहसानने ८३ चेंडूत ७० धावांची नेत्रदीपक खेळी केली. यामध्ये त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले, पण अखेर त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

३८ षटकांअखेर पाकिस्तानची धावसंख्या ७ बाद १३८

झटपट विकेट! चौहानच्या फिरकीवर अब्दुल सुभान 'स्टंप'आऊट!

सामन्यातील एका महत्त्वाच्या क्षणी गोलंदाज कणिक चौहानने आपल्या फिरकीची जादू दाखवत फलंदाज अब्दुल सुभानला तंबूचा रस्ता दाखवला आहे. ३६.४ षटकांवर कणिक चौहानने टाकलेला चेंडू अब्दुल सुभानला समजला नाही आणि तो बीट झाला. यष्टिरक्षक अभिज्ञान कुंडूने कोणतीही चूक न करता क्षणाचाही विलंब न लावता चेंडू यष्ट्यांवर मारला आणि सुभानला 'स्टंप'आऊट केले. अब्दुल सुभानने १४ चेंडूंचा सामना करताना एका चौकाराच्या मदतीने केवळ ६ धावा केल्या. असा आवाज मैदानात घुमताच कणिक चौहान आणि संघाने एकच जल्लोष केला. हा बळी मिळाल्याने गोलंदाजी करणाऱ्या संघाला मोठी विश्रांती मिळाली आहे.

हमझा जहूरचा डाव संपुष्टात

एका निर्णायक क्षणी फलंदाजी करणाऱ्या हमझा जहूरची झुंज अखेर संपुष्टात आली आहे. ३१.४ षटकांवर गोलंदाज खिल्लन पटेलने टाकलेला चेंडू हमझा जहूरच्या बॅटला लागून थेट क्षेत्ररक्षक विहान मल्होत्राच्या हातात विसावला. खिल्लन पटेलच्या भेदक माऱ्यासमोर हमझा जहूर केवळ ४ धावा (२० चेंडूत) करून माघारी परतला. हा महत्त्वाचा बळी मिळाल्याने खिल्लन पटेल आणि संपूर्ण संघाने जल्लोष केला. विहान मल्होत्राने घेतलेला हा झेल सामन्याला कलाटणी देणारा ठरू शकतो. आता पुढचा फलंदाज मैदानात आल्यावर संघाची धावसंख्या कशी वाढेल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

३० षटकांअखेर पाकिस्तानची धावसंख्या ५ बाद १०१

वैभवाचा 'सूर्य' तळपला!

प्रतिस्पर्धी पकिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पाडत गोलंदाज वैभव सूर्यवंशी याने महत्त्वाची विकेट मिळवली आहे. फरहान युसूफ याने केलेली 23 धावांची छोटी पण वेगवान खेळी 23.6 व्या षटकात संपुष्टात आली. फरहानने आपल्या 34 चेंडूंच्या खेळीत 2 चौकार आणि 1 उत्तुंग षटकार मारत धावफलक वेगाने हलवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वैभव सूर्यवंशीने त्याला चकवले आणि फरहानने मारलेला फटका सीमारेषेवर उभ्या असलेल्या बदली क्षेत्ररक्षक नमन पुष्पक याच्या हातात विसावला. दीपेश देवंद्रन नंतर आता बदली खेळाडू नमन पुष्पकने आपला दुसरा महत्त्वाचा झेल घेऊन संघाला मोठी मदत केली आहे. फरहान युसूफ बाद झाल्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या मधल्या फळीवर आता प्रचंड दबाव आला आहे.

२० षटकांअखेर पाकिस्तानची धावसंख्या ४ बाद ५६

१८ षटकांअखेर पाकिस्तानची धावसंख्या ४ बाद ४७

१५ षटकांअखेर पाकिस्तानची धावसंख्या ४ बाद ३७

'कानिष्क एक्सप्रेस'चा वेग!

गोलंदाज कानिष्क चौहानने संघासाठी अत्यंत महत्त्वाचा बळी मिळवत प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मोठा धक्का दिला. 13.1 व्या षटकात कानिष्कने फलंदाज उस्मान खान याला 16 धावांवर बाद केले. उस्मान खानने 42 चेंडूंचा सामना करत, एक चौकार आणि एक षटकार मारून संयमी खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याची ही धीम्या गतीची खेळी अधिक काळ टिकू शकली नाही. कानिष्कच्या अचूक टप्प्यावर आलेल्या चेंडूवर उस्मानने फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू थेट आयुष म्हात्रे याच्या हातात गेला आणि आयुषने हा झेल सहजपणे पकडला. या विकेटमुळे कानिष्क चौहानने आपल्या संघाला मोठा ब्रेकथ्रू दिला असून, आता प्रतिस्पर्धी संघाचे मधले फळीचे फलंदाज दबावात आले आहेत.

१४ षटकांअखेर पाकिस्तानची धावसंख्या ४ बाद ३६

गोलंदाज दीपेश देवंद्रन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, त्याने भारतीय संघाला आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले आहे. डावाच्या 12.5 व्या षटकात दीपेशने टाकलेल्या चेंडूवर फलंदाज अहमद हुसेन केवळ 4 धावा काढून तंबूत परतला. हुसेनने 10 चेंडूंचा सामना केला, मात्र तो मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. दीपेशच्या भेदक गोलंदाजीवर अहमद हुसेनने मारलेला फटका क्षेत्ररक्षक अभिज्ञान कुंडू याच्या दिशेने गेला. अभिज्ञानने कोणताही धोका न पत्करता तो सोपा झेल अचूकपणे पकडला आणि हुसेनचा डाव संपवला. समीर मिन्हासला बाद केल्यानंतर दीपेश देवंद्रनने घेतलेली ही दुसरी महत्त्वाची विकेट आहे. त्याच्या या 'डबल धमाक्या'मुळे प्रतिस्पर्धी संघाला मोठा धक्का बसला आहे.

१३ षटकांअखेर पाकिस्तानची धावसंख्या ३ बाद ३०

अली हसन बलुच शून्यावर बाद

भारताने पाकिस्तानला पुन्हा मोठा धक्का दिला. भारताचा गोलंदाज दीपेश देवेंद्रन याने भेदक मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजीतील महत्त्वाचा मोहरा असलेल्या अली हसन बलुच याला शून्यावर तंबूत पाठवले. सामन्याच्या १०.३ षटकात हा नाट्यमय क्षण घडला. दीपेशच्या अचूक टप्प्यावरील चेंडूवर अली हसन बलुच फटका मारण्याच्या प्रयत्नात चुकला आणि त्याने अभिज्ञान कुंडू याच्या हातात सोपा झेल दिला. अली हसनला ६ चेंडू खेळूनही खाते उघडता आले नाही. दीपेशच्या या महत्त्वपूर्ण विकेटमुळे पाकिस्तानच्या डावाची गती रोखण्यात भारताला यश आले असून, आता सामन्यात रोमांच वाढला आहे.

११ षटकांअखेर पाकिस्तानची धावसंख्या २ बाद २५

दीपेश देवंद्रनची कमाल.. सलामीवीर समीर मिन्हास माघारी

बदली खेळाडू नमन पुष्पकने घेतलेला एक जबरदस्त झेल चर्चेचा विषय ठरला. गोलंदाज दीपेश देवंद्रन उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज म्हणून नुकताच गोलंदाजीसाठी आला होता, त्याने टाकलेल्या 8.1 व्या षटकात पाकिस्तानचा फलंदाज समीर मिन्हास अवघ्या 9 धावांवर बाद झाला. समीर (9 धावा, 20 चेंडू, 2 चौकार) चांगली सुरूवात मिळाल्यानंतरही मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. दीपेश देवंद्रनने अचूक टप्प्यावर टाकलेल्या चेंडूवर त्याने मारलेला फटका थेट हवेत गेला आणि सीमारेषेवर उभ्या असलेल्या बदली क्षेत्ररक्षक नमन पुष्पक याने कोणतीही चूक न करता तो झेल पकडला. या महत्त्वपूर्ण विकेटमुळे दीपेश देवंद्रनने आपल्या गोलंदाजीची चांगली सुरूवात केली असून, मिन्हासच्या रूपात संघाला मोठा ब्रेकथ्रू मिळाला आहे.

९ षटकांअखेर पाकिस्तानची धावसंख्या २ बाद २२

दुबई : क्रिकेट विश्वातील पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंडर-19 आशिया कप २०२५ (U19 Asia Cup 2025) चा बहुप्रतिक्षित सामना भारतीयांसाठी निराशाजनक ठरला. पाकिस्तानच्या मा-यापुढे भारताचा संपूर्ण संघ केवळ ४६ षटकांत २४० धावांवर तंबूत परतला. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी २४१ धावांचे आव्हान ठेवले आहे.

या महत्त्वाच्या लढतीत, मागील सामन्याचा शतकवीर आणि भारताचा 'विस्फोटक' फलंदाज वैभव सूर्यवंशी याचा बल्ला शांत राहिला, तर दुसऱ्या बाजूला सलामीवीर एरोन जॉर्ज याने आपल्या संयमी आणि दमदार खेळीने भारतीय डावाला तारले.

'वैभव' फिका पडला, जॉर्जची ८५ धावांची 'झंझावाती' खेळी

सामन्याला पावसामुळे उशिरा सुरुवात झाली. टॉस जिंकून पाकिस्तानने भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांवर दबाव ठेवला.

निराशाजनक कामगिरी : यूएईविरुद्ध १७१ धावांची ऐतिहासिक खेळी करणारा वैभव सूर्यवंशी पाकिस्तानविरुद्ध सपशेल अपयशी ठरला. त्याने केवळ ६ चेंडूंमध्ये ५ धावा करून आपली विकेट गमावली.

कर्णधाराची 'झटपट' खेळी : कर्णधार आयुष महात्रे याने मात्र २७ चेंडूत ४ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ३८ धावांची एक तेज खेळी केली, पण तो मोठी धावसंख्या करू शकला नाही.

एरोन जॉर्जचा संयम : एका बाजूला विकेट्स पडत असताना, तिस-या क्रमांकावर आलेल्या एरोन जॉर्ज याने अत्यंत शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने १२ चौकार आणि १ षटकार ठोकत ८५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तो शतकाच्या अगदी जवळ पोहोचला होता, पण तिथेच त्याला आपली विकेट गमवावी लागली.

मधल्या फळीचे अपयश अन् कनिष्कचा 'फिनिशिंग टच'

भारताच्या मधल्या फळीने पुन्हा एकदा निराशा केली. विहान मलहोत्रा (१२) आणि वेदान्त त्रिवेदी (७) हे स्वस्तात बाद झाले. अभिज्ञान कुंडूने २२ धावांची छोटी, पण उपयुक्त खेळी केली. परंतु, सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कनिष्क चौहान याने मोक्याच्या वेळी ४६ चेंडूंत ४६ धावांची संयमी खेळी करत संघाला अडीचशेच्या जवळ नेले. त्याने अर्धशतक पूर्ण केले नसले तरी, शेवटच्या क्षणी त्याने दिलेल्या योगदानामुळेच भारताला २४० धावांचा आकडा गाठता आला. शेवटी हेनिल पटेलने १२ धावा केल्या, पण भारतीय संघ ४६ व्या षटकातच ऑल आऊट झाला.

पाकिस्तानच्या गोलंदाजांचा 'कहर'

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधी दिली नाही. मोहम्मद सैयाम आणि अब्दुल शुभान या दोघांनी प्रत्येकी ३-३ बळी घेऊन भारतीय डावाला खिंडार पाडले. निकाब शफीकने २, तर अली राजा आणि अहमद हुसैन यांनी १-१ बळी मिळवला. या रोमांचक लढतीत आता पाकिस्तानला विजयासाठी २४१ धावा करायच्या आहेत. भारतीय गोलंदाज आपल्या फलंदाजांच्या अपयशाची भरपाई करून संघाला विजय मिळवून देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT