मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडेच राहणार आहे. परंतु, यावेळी त्यांनी दोन उपकर्णधार नेमले आहेत. ट्रॅव्हिस हेड व स्टिव्ह स्मिथ या दोघांच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली आहे.
साधारण संघात एकच उपकर्णधार निवडतात. परंतु, ऑस्ट्रेलियाने दोन उपकर्णधार निवडून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. मागील सहा वर्षांत ऑस्ट्रेलियाने ही परंपरा सुरू केली आहे. पाकिस्तानविरुद्ध 2023 च्या डिसेंबरमध्ये झालेल्या मालिकेत ट्रॅव्हिस हेडकडे पहिल्यांदा उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली होती.
‘ट्रॅव्हिस हेडचे नाव सह उपकर्णधार म्हणून पाहून चांगले वाटतेय,’ असे कमिन्स मागच्या वर्षी म्हणाला होता. तो प्रदीर्घ काळापासून आमच्यासोबत खेळतोय आणि आमच्या ग्रुपमधील तो लीडरच आहे. त्यामुळे त्याच्याकडे उपकर्णधारपद देण्याची हिच ती योग्य वेळ असल्याचे आम्हाला वाटले, असेही कमिन्सने म्हटले होते. त्याने पुढे सांगितले होते की, स्टिव्ह संघासाठी कायम खेळत राहीलच असे नाही, तसंच मी पण कायमस्वरूपी कर्णधारपदावर असेनच असे नाही. त्यामुळे भविष्यात कोणाकडे तरी ही जबाबदारी जाईल आणि त्यासाठीची तयारी म्हणून असा निर्णय घेतला गेला आहे.
स्मिथ हा संघातील सीनियर उपकर्णधार आहे आणि कमिन्सच्या गैरहजेरीत तो नेतृत्व करेल. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा हा प्रयोग केला तेव्हा टीम पेनच्या नेतृत्वाखाली ट्रॅव्हिस हेड व पॅट कमिन्स हे उपकर्णधार होते. 2019 मध्ये कमिन्स व हेडकडे ही जबाबदारी दिली गेली होती. त्याआधी मिशेल मार्श व जोश हेझलवूड हे दोन उपकर्णधार होते. हेडने या मालिकेत 89, 140, 152 व 17 अशी खेळी केली आहे. त्याने भारताविरुद्धच्या मालिकेत 81.80 च्या सरासरीने एकूण 409 धावा केल्या आहेत.