अॅडलेड; वृत्तसंस्था : अॅडलेड ओव्हलवर सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील तिसर्या कसोटीत स्थानिक खेळाडू ट्रॅव्हिस हेडने आपल्या घरच्या मैदानावर पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली आहे. त्याच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने दुसर्या डावात 4 बाद 271 धावा करत इंग्लंडवर 356 धावांची अवाढव्य आघाडी मिळवली आहे.
ट्रॅव्हिस हेडने (नाबाद 142) या मालिकेत सलामीवीर म्हणून दुसरे शतक झळकावले. अॅडलेडमध्ये सलग चार कसोटी सामन्यांत शतके ठोकणारा तो डॉन ब्रॅडमन यांच्यानंतरचा केवळ चौथा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. दरम्यान, इंग्लंडने 8 बाद 213 धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली होती. बेन स्टोक्स (83) आणि जोफ्रा आर्चर (51) यांनी 9 व्या गड्यासाठी 106 धावांची ऐतिहासिक भागीदारी केली. अखेर स्टार्कने बेन स्टोक्सचा त्रिफळा उडवून ही भागीदारी तोडली. इंग्लंडचा पहिला डाव 286 धावांवर आटोपला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील 85 धावांच्या आघाडीसह दुसर्या डावाची सुरुवात केली. जेक वेदरल्ड (1), मार्नस लॅबुशेन (13) आणि कॅमेरून ग्रीन (7) स्वस्तात बाद झाले, तरी हेडने अॅलेक्स कॅरीसोबत (नाबाद 52) 122 धावांची अभेद्य भागीदारी केली. या जोडीने तिसर्या सत्रात 152 धावा कुटत इंग्लंडच्या गोलंदाजांना हतबल केले.
संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया : 371 आणि 4 बाद 271 (ट्रॅव्हिस हेड नाबाद 142, अॅलेक्स कॅरी नाबाद 52)
इंग्लंड : 286 (बेन स्टोक्स 83, जोफ्रा आर्चर 51; स्कॉट बोलँड 3-45, पॅट कमिन्स 3-69), आघाडी : ऑस्ट्रेलिया 356 धावांनी पुढे.