नवी दिल्ली; वृत्तसंस्था : येत्या 13 ते 21 सप्टेंबरदरम्यान टोकियो येथे होणार्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) रविवारी 19 सदस्यीय संघाची घोषणा केली. विद्यमान विश्वविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा या संघाचे नेतृत्व करणार असून, तोच भारतासाठी पदकाचा सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र, वैद्यकीय कारणास्तव स्टीपलचेसपटू अविनाश साबळे याला संघातून वगळण्यात आले आहे. हा मोठा धक्का मानला जात आहे.
भारतीय संघात 14 पुरुष आणि 5 महिला अॅथलिटसचा समावेश असून, ते एकूण 15 क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.
पात्रता निकषांद्वारे स्थान
गुलवीर सिंग (5000 मीटर, 10,000 मीटर शर्यत), प्रवीण चित्रवेल (तिहेरी उडी) व पारुल चौधरी (3000 मीटर स्टीपलचेस) या तीन भारतीय खेळाडूंनी स्पर्धेतील प्रवेशासाठीचे पात्रता निकष पूर्ण करून आपले स्थान निश्चित केले आहे. याशिवाय, मध्यम पल्ल्याची धावपटू पूजा ही दोन स्पर्धांमध्ये (800 मीटर आणि 1500 मीटर) भाग घेणारी एकमेव भारतीय खेळाडू असेल.
साबळे, नंदिनी, अक्षदीप
तंदुरुस्ती नसल्याने बाहेर
अविनाश साबळे, नंदिनी आगासरा आणि अक्षदीप सिंग या तीन खेळाडूंनी पात्रता मिळवली असूनही, तंदुरुस्त नसल्यामुळे त्यांची निवड करण्यात आलेली नाही.