स्पोर्ट्स

Controversy : माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणच्या सासऱ्यांना मारहाणप्रकरणी अटक, मेहुण्यासह तिघांनाही बेड्या

पाणी अंगावर उडाल्याने भररस्त्यात धुमाकूळ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील भायखळा परिसरात एका क्षुल्लक वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावरील साचलेल्या पाण्याचे शिंतोडे अंगावर उडाल्याच्या कारणावरून झालेल्या या वादात माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार युसूफ पठाण यांचे सासरे आणि मेहुण्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या हिंसक संघर्षात एका व्यक्तीचा हात फ्रॅक्चर झाला असून, न्यायालयाने आरोपींची २ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. तक्रारदार युसूफ खान हे आपल्या कारने घरी परतत असताना, रस्त्यावरील खड्ड्यात साचलेले सांडपाणी कारचे चाक गेल्याने बाजूला उभ्या असलेल्या शोएब खान याच्या अंगावर उडाले. माणुसकीच्या नात्याने युसूफ खान यांनी तात्काळ गाडी थांबवून माफी मागितली, मात्र शोएबचा राग अनावर झाला होता. त्याने केवळ शिवीगाळच केली नाही, तर बांबूच्या काठीने कारची काच फोडून युसूफ खान यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात

हा वाद तिथेच थांबला नाही. पीडित युसूफ खान आपल्या कुटुंबासह तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे जात असताना, वाटेतच त्यांची पुन्हा दुसऱ्या गटाशी गाठ पडली. यावेळी वाद अधिकच विकोपाला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी खासदार युसूफ पठाण यांचे सासरे खालिद खान, त्यांचा मुलगा उमरशाद खान आणि अन्य एक नातेवाईक शहबाज पठाण उपस्थित होते. आरोप आहे की, या सर्वांनी मिळून युसूफ खान आणि त्यांच्या कुटुंबावर लाठ्या-काठ्या तसेच बेसबॉल बॅटने हल्ला चढवला. या भयंकर मारहाणीत युसूफ खान यांच्या मेहुण्याचा हात फ्रॅक्चर झाला असून इतर नातेवाईकही गंभीर जखमी झाले आहेत.

सीसीटीव्ही आणि साक्षीदारांच्या आधारे कारवाई

घटनेनंतर भायखळा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी खालिद खान, उमरशाद खान आणि शोएब खान यांना अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २ मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.

बचाव पक्षाचा दावा

दुसरीकडे, आरोपींच्या वकिलांनी हा दावा फेटाळून लावला आहे. वकील दयानंद यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना दोन्ही बाजूंनी झालेल्या वादाचा परिणाम आहे. पोलिसांनी केवळ एकाच बाजूची बाजू लावून धरली असून वस्तुस्थिती वेगळी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हल्ला केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, जप्त केलेले साहित्य आणि व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. दरम्यान, आपले नातेवाईक या प्रकरणात अडकल्यानंतरही खासदार युसूफ पठाण यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT