Asia Cup Final : विजयी ‘तिलक’! आशियात भारतच किंग, पाकला लोळवले Pudhari File Photo
स्पोर्ट्स

Asia Cup Final : विजयी ‘तिलक’! आशियात भारतच किंग, पाकला लोळवले

विजय खेचून आणण्यात दुबे-सॅमसन-तिलकला यश

पुढारी वृत्तसेवा

दुबई; वृत्तसंस्था : तिलक वर्मा (53 चेंडूंत नाबाद 69), शिवम दुबे (22 चेंडूंत 33) व संजू सॅमसन (24) यांनी निर्णायक टप्प्यात चढवलेल्या जोरदार हल्ल्यात पाकिस्तानचा संघ नेस्तनाबूत झाला आणि भारताने पाकच्या जबड्यातून अक्षरश: विजय खेचून आणत आशिया चषक जेतेपदावर अगदी थाटामाटात शिक्कामोर्तब केले! भारताने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या रोमांचक लढतीत प्रारंभी पाकिस्तानला 1 बाद 113 वरून सर्वबाद 146 धावांवर रोखले तर प्रत्युत्तरात19.4 षटकांत 5 बाद 150 धावांसह सनसनाटी विजय संपादन केला.

विजयासाठी शेवटच्या 3 षटकांत 30 धावांची आवश्यकता असताना भारताने 18 व्या षटकात 13 धावा वसूल केल्या तर 19 व्या षटकात आणखी 7 धावांची भर घातली. निर्णायक शेवटच्या षटकात 10 धावांची आवश्यकता असताना तिलक वर्माने पहिल्या 3 चेंडूंत 9 धावा वसूल करत विजयाचे दरवाजे उघडले तर रिंकूने दमदार चौकार फटकावत पाकिस्तानच्या आशा-अपेक्षांना शेवटचा सुरुंग लावला. या लढतीत विजयासाठी 147 धावांचे आव्हान असताना अभिषेक शर्मा (5) प्रारंभीच बेजबाबदार फटका मारत बाद झाल्याने भारताला पहिला झटका बसला. अगदी पहिल्या चेंडूपासूनच उत्तुंग फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अभिषेकने फहीम अश्रफच्या गोलंदाजीवर रौफकडे सोपा झेल दिला. आऊटसाईड ऑफ स्टम्पवरील त्या चेंडूवर अभिषेक नेहमीच्या स्टाईलने उत्तुंग षटकार मारण्याच्या पवित्र्यात होता. मात्र, यादरम्यान त्याचा अंदाज सपशेल चुकला आणि पाकला पहिले यश मिळाले.

या स्पर्धेत फारशा बहरात नसलेल्या सूर्यकुमार यादवने (1) या निर्णायक लढतीत देखील निराशा केली. त्याने शाहिनच्या गोलंदाजीवर आगाकडे झेल दिला. आगाने पुढे डाईव्ह मारत झेल टिपत सूर्याची खेळी संपुष्टात आणली. यानंतर शुभमन गिल तिसर्‍या षटकात धावचीत होता होता वाचला. पण, या जीवदानाचा त्याला अजिबात लाभ घेता आला नाही. उलटपक्षी, त्याने लवकरच अतिशय बेजबाबदार फटका मारत आपली विकेट गमावली आणि भारताला आणखी एक धक्का बसला. फहीम अश्रफच्या कटरवर गिलने मिडऑनच्या दिशेने आततायी फटका मारल्यानंतर रौफने हवेत झेपावून अप्रतिम झेल टिपला. आघाडी फळीतील तिन्ही फलंदाज अतिशय स्वस्तात गारद झाल्यानंतर तिलक वर्मा व संजू सॅमसन यांनी डाव सावरत पाकिस्तानवर हळूहळू दडपण आणले आणि नंतर विजयही खेचून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला.

तत्पूर्वी, कुलदीप यादवने अवघ्या 30 चेंडूंत 4 फलंदाज गारद केल्यानंतर त्याला अक्षर पटेल व वरुण चक्रवर्ती यांचीही समयोचित साथ लाभली आणि या बळावर भारताने पाकिस्तानला 19.1 षटकांतच सर्वबाद 146 धावांवर गुंडाळले. वास्तविक, प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर पाकिस्तानतर्फे फरहान व फखर झमान यांच्या फटकेबाजीने एकच धुमाकूळ घातला होता. मात्र, ही जोडगोळी तंबूत परतली आणि त्यानंतर त्यांच्या डावाला अक्षरश: ग्रहण लागले. कुलदीप यादव, अक्षर पटेल व वरुण चक्रवर्ती यांनी एकत्रित 8 बळी घेत पाकिस्तानच्या डावाला भलेमोठे सुरुंग पाडले आणि यातून पाकिस्तानला सावरता येणे निव्वळ अशक्य होते. फरहान व झमान यांनी प्रारंभी सावध फलंदाजी केली. मात्र, एकदा सेट झाल्यानंतर त्यांनी चौफेर फटकेबाजी करत 9.4 षटकांत 84 धावांची जोरदार सलामी मिळवून दिली. अखेर फरहानला वरुणने झेलबाद केले आणि डोकेदुखी ठरणारी ही जोडी फोडत दिलासा मिळवून दिला.

तिसर्‍या क्रमांकावरील सईम अयुब 14 धावांवर बाद झाल्याने पाकिस्तानला दुसरा धक्का बसला आणि इथूनच त्यांची जोरदार घसरगुंडी सुरू झाली. एक बाजू लावून धरणार्‍या झमानने 46 धावांवर असताना वरुणच्या गोलंदाजीवर कुलदीपकडे झेल दिला आणि त्यानंतर पाकिस्तानचा पुढील एकही फलंदाज अगदी दुहेरी धावसंख्याही गाठू शकला नाही. मोहम्मद हॅरिस (0), सलमान आगा (8), हुसेन तलत (1), नवाझ (6) एकेरी धावसंख्येवर बाद झाले तर शाहिन शाह आफ्रिदी, फहीम अश्रफ यांना भोपळाही फोडता आला नाही. हॅरिस रौफ बुमराहच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला आणि इथेच पाकिस्तानचा डाव 19.1 षटकांत सर्वबाद 146 धावांवर संपुष्टात आला.

शिवम दुबे-सॅमसन-तिलकने खेचून आणला विजयाचा घास!

विजयासाठी 147 धावांची गरज असताना भारताची एकवेळ 3 बाद 20 अशी दाणादाण उडाली असताना याचवेळी संजू सॅमसन व तिलक वर्मा ही जोडी मैदानावर जमली आणि या उभयतांनी चौथ्या गड्यासाठी 57 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. सॅमसननंतर 13 व्या षटकात बाद झाला, त्यावेळी भारताची 4 बाद 77 अशी स्थिती होती. यानंतर तिलकने सर्व सूत्रे हाताशी घेत 53 चेंडूंत 69 धावांची आतषबाजी केली आणि ‘नापाक’ पाकचे विजयाचे इरादे अक्षरश: धुळीस मिळवले. दुबेची 22 चेंडूंतील 33 धावांची तडाखेबंद खेळीदेखील तितकीच लक्षवेधी ठरली!

फरहानची अक्कलही ठिकाण्यावर, अर्धशतकानंतर नो सेलिब्रेशन!

यापूर्वी, अर्धशतक झळकावल्यानंतर गनफायर सेलिब्रेशन करत मुजोरी दाखवणार्‍या साहेबजादा फरहानची अक्कल या निर्णायक सामन्यात मात्र ठिकाणावर आल्याचे दिसून आले. फरहानने येथे अर्धशतक झळकावल्यानंतर केवळ बॅट हातात वर घेत आपल्या सेलिब्रेशनवर लगाम घातला.

पाकिस्तानने गारद केले पहिल्या 4 षटकांतच 3 बळी, तरीही...

विजयासाठी 147 धावांचे आव्हान असताना भारताने पहिली 4 षटके पूर्ण होण्यापूर्वीच अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव व शुभमन गिल असे 3 बिनीचे मोहरे गमावले आणि यामुळे भारताची प्रारंभीच 3 बाद 20 अशी दैना उडाली होती. पण, नंतर तिलक, सॅमसन व दुबेने पलटवार केल्यानंतर भारताला आशिया चषकातील नवव्या जेतेपदावर शिक्कामोर्तब करता आले.

असा रंगला शेवटच्या षटकाचा थरार!

शेवटच्या षटकात विजयासाठी 10 धावांची आवश्यकता असताना तिलक वर्माने पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्या आणि त्यानंतर पुढील चेंडूवरच डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने उत्तुंग षटकार खेचत विजय अक्षरश: आवाक्यात आणून ठेवला. यानंतर उर्वरित 4 चेंडूंत 2 धावा असे समीकरण असताना त्याने एकेरी धाव घेत संघाला बरोबरीत आणले. पुढे रिंकू सिंगने फ्रंटफूटवर येत मिड ऑनच्या दिशेने दणकेबाज चौकार फटकावला आणि इथेच भारताच्या दणकेबाज विजयावर शिक्कामोर्तब झाले.

रिंकू सिंगचा स्पर्धेतील स्ट्राईक रेट 400!

या स्पर्धेत फायनलपूर्वी एकही संधी न मिळालेल्या रिंकू सिंगला येथे मात्र विजयावर शिक्कामोर्तब करून देण्याची नामी संधी मिळाली. विजयासाठी एका धावेची आवश्यकता असताना रिंकूने सणसणीत चौकार फटकावत विजय मिळवून दिला आणि त्याचा स्ट्राईक रेट 400 वर पोहोचला!

खेळाच्या मैदानावर ‘ऑपरेशन सिंदूर’; पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचे मनापासून अभिनंदन केले. खेळाच्या मैदानावर ‘ऑपरेशन सिंदूर. परिणाम तोच - भारताचा विजय! क्रिकेटपटूंचे अभिनंदन’, असे पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT