मुंबई : प्रो-कबड्डी लीग (पीकेएल) स्पर्धेच्या 12 व्या मोसमाचा प्रारंभ 29 ऑगस्ट रोजी विझाग येथे होणार असून, यंदाच्या मोसमात एकूण 12 संघ विझाग, जयपूर, चेन्नई, दिल्ली या चार ठिकाणी होणार्या सत्रांमधून विजेतेपदासाठी झुंजणार आहेत. विझाग येथील राजीव गांधी इनडोअर स्टेडियममध्ये तेलगू टायटन्स विरुद्ध तामिळ थलायवाज आणि बेंगळुरू बुल्स विरुद्ध पुणेरी पलटण अशा ब्लॉकबस्टर लढतींनी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
स्पर्धेचे दुसरे सत्र शुक्रवार, दि. 12 सप्टेंबरपासून जयपूर येथील एसएमएस स्टेडियमच्या जयपूर इंडोर हॉलमध्ये रंगणार आहे. पहिल्या दिवशी दोन वेळच्या विजेत्या जयपूर पिंक पँथर्स संघासमोर बेंगळुरू बुल्स संघाचे आव्हान असून, दुसर्या लढतीत तामिळ थलायवाज विरुद्ध बंगाल वॉरियर्स यांच्यात सामना रंगणार आहे. जयपूरच्या नावावर 2023-2024 मध्ये स्पर्धेच्या 10 व्या मोसमात प्रो-कबड्डी लीगच्या ऐतिहासिक 1000 व्या लढतीचे आयोजन करण्याचा मान नोंदवण्यात आला आहे.
स्पर्धेचे तिसरे सत्र 29 सप्टेंबरपासून चेन्नई येथील एसडीएटी इंडोर स्टेडियम येथे रंगणार आहे. पहिल्या दिवशी यूपी योद्धाज विरुद्ध गुजरात जायंटस्, तसेच दबंग दिल्ली केसी विरुद्ध हरियाणा स्टीलर्स असे सामने होणार आहेत. साखळी स्पर्धेतील अखेरचे सत्र दिल्ली येथील त्यागराज स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथे 13 ऑक्टोबरपासून रंगणार आहे. प्ले-ऑफ स्पर्धेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.