FIFA World Cup | यंदाचा फिफा वर्ल्ड कप ठरणार सर्वात ‘हॉट’ 
स्पोर्ट्स

FIFA World Cup | यंदाचा फिफा वर्ल्ड कप ठरणार सर्वात ‘हॉट’

तज्‍ज्ञांचा अंदाज; पर्यावरणासह खेळाडूंचे आरोग्य, रेफ्रींचे मानसशास्‍त्र यावर परिणाम शक्य

पुढारी वृत्तसेवा

लंडन; वृत्तसंस्‍था : २०२६ च्या फिफा (FIFA) वर्ल्ड कपचा थरार सुरू होण्यास अवघा एक आठवडा उरला आहे. या पार्श्वभूमीवर, ‘द गार्डियन'च्या सायन्स वीकली पॉडकास्टमध्ये या महाकुंभाच्या पडद्यामागील विज्ञानावर आणि त्‍याच्‍याशी संबंधित आव्हानांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यंदाचा वर्ल्ड कप हा आजवरच्या इतिहासातील सर्वात उष्ण वर्ल्ड कप असण्याची शक्यता असून, यामध्ये खेळाडूंचे आरोग्य, पर्यावरण आणि रेफ्रींचे मानसशास्त्र यावर तज्ज्ञांनी सखोल चर्चेदरम्‍यान आपली निरीक्षणे, अंदाज व्‍यक्‍त केले आहेत. या स्पर्धेतील तीन सर्वात मोठे वैज्ञानिक मुद्दे आणि आव्हाने असणार असल्‍याचे तज्‍ज्ञांनी म्‍हटले आहे.

जीवाश्म इंधन आणि ‘स्पोर्टस्‌ वॉशिंग’चा वाद

या स्पर्धेदरम्यान विमानांचा प्रवास आणि वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होणार आहे. मोठ्या क्रीडा स्पर्धांच्या ग्लॅमरचा वापर करून स्वतःची डागाळलेली प्रतिमा सुधारणे किंवा पर्यावरणीय चुकांवर पांघरुण घालणे, त्‍याला ‘स्पोर्टस्‌ वॉशिंग' म्हटले जाते, त्याविषयीही पॉडकास्टमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली.

खेळाडूंना उष्माघाताचा मोठा धोका; कामगिरीवर परिणाम

ब्रुनेल युनिव्हर्सिटीचे डॉ. ऑलिव्हर गिब्सन यांनी चिंता व्यक्त केली की, वाढत्या तापमानामुळे खेळाडू आणि रेफ्रींना उष्माघाताचा प्रचंड त्रास होऊ शकतो. खेळाडूंचे डिहायड्रेशन होऊन शारीरिक क्षमता घटू शकते. अतिउष्णतेमुळे खेळाडूंच्या कामगिरीवर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ नये म्हणून वैज्ञानिकांनी ‘फिफा'ला उष्णतेचे नियम व उपाययोजना पुन्हा तपासण्याची विनंती केली आहे.

सामन्यांदरम्यान प्रेक्षकांना स्टेडियममध्ये ‘रियुझेबल’ पाण्याच्या बाटल्या आणण्यास बंदी

दोहा : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना, फिफाने स्टेडियममधील नियमावलीत ऐनवेळी मोठा बदल केला आहे. नवीन नियमांनुसार, सुरक्षेचा उपाय म्हणून प्रेक्षकांना स्टेडियममध्ये स्वतःच्या ‘रियुझेबल’ (पुन्हा वापरता येण्याजोग्या) पाण्याच्या बाटल्या घेऊन जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यापर्यंत फिफाने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये १ लिटरपर्यंतच्या रिकाम्या, पारदर्शक आणि रियुझेबल प्लास्टिक बाटल्या आणण्यास परवानगी दिली होती. विश्वचषकादरम्यान काही शहरांमध्ये तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. अशा उष्ण वातावरणात स्टेडियममध्ये पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय कशी असेल, याबद्दल चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तथापि, सामन्यादरम्यान खेळाडूंना दोन्ही सत्रात ठराविक वेळेनंतर 'हायड्रेशन ब्रेक' दिले जाणार आहेत. चाहत्यांच्या सुविधेसाठी स्टेडियमच्या आवारात ‘हायड्रेशन स्टेशन्स’ (पाण्याची सोय) उभारली जातील, असे फिफाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT