ठाणे : खेळात जिंकता येतं, हरता येतं अन हारल्या नंतर पुन्हा नवी सुरवात करता येते. खेळामुळे माणसाच्या मनात खेळाडू भावना निर्माण होते. म्हणूनच खेळाचं जीवनात विशेष महत्व आहे. राज्य पोलीस दलाच्या खेळाडूंनी देशपातळीवर विशेष कामगिरी बजावली आहे, त्यामुळे राज्य पोलीस दलाने येत्या ऑलम्पिक स्पर्धेत सहभाग घेवा आणि आगामी मिशन ऑलम्पिकची तयारी सुरू करावी. त्यासाठी खेळाडूंना लागणाऱ्या सर्व साधन सुविधा पुरवण्यात येतील असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात सांगितले. पस्तीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप कार्यक्रम शनिवारी (दि.1) ठाण्यात संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते.
पस्तीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे ठाण्यात आयोजन करण्यात आले असून 22 फेब्रुवारी पासून या स्पर्धेस सुरवात झाली होती. या क्रीडा स्पर्धेचा समारोप शनिवारी (1 मार्च) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र डॉ.संजय दराडे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी विजेत्या मुंबई संघास पारितोषिक देण्यात आले. आपल्या भाषणातून मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस विभागातील खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. यापुढेही जास्तीत जास्त पोलीस खेळाडूंनी अशा स्पर्धांमध्ये आवर्जून भाग घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले. या स्पर्धेत महिला खेळाडूंचा सहभाग लक्षणीय असून त्यांचे विशेष अभिनंदनही मुख्यमंत्र्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे पोलीस दल देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र देशात औद्योगिक दृष्ट्या क्रमांक एकवर येण्यातही पोलीस विभागाचे योगदान महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला आहे. त्यामुळेच संपूर्ण देशात महाराष्ट्र पोलीस दलाची कामगिरी बेंचमार्क म्हणून पाहिली जाते. ही ओळख कायम टिकविण्यासाठी पोलिसांनी अधिक जबाबदारीने अधिक पारदर्शकतेने काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या काळात खूप काम करावे लागणार आहे. जशी खेळात संघभावना जोपासली जाते तशीच दैनंदिन कामकाजातही ही संघभावना जोपासायला हवी. खेळात जिंकता येतं, हरता येतं अन हारल्या नंतर पुन्हा नवी सुरवात करता येते. खेळामुळे माणसाच्या मनात खेळाडू भावना निर्माण होते. म्हणूनच खेळाचं जीवनात विशेष महत्व आहे. पोलीस खेळाडूंनी ऑलम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर समावेश होण्यासाठी खेळातील कामगिरी त्या दर्जाची करावी. यासाठी शासन सर्व स्तरावर पाठीशी उभे राहील असे आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
ठाण्यात संपन्न झालेल्या 35व्या क्रीडा स्पर्धेचे अत्यंत उत्कृष्ट आयोजन करण्यात आल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयोजन समितीचे अभिनंदन केले. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या राज्यभरातील संघाकडून मुख्यमंत्र्यांना संचालन करून मानवंदना देम्यात आली.