स्पोर्ट्स

भारताविरुद्ध कसोटीत ‘बॅझबॉल’ शैलीतच खेळू : ब्रेंडन मॅक्युलम

Arun Patil

बंगळूर, वृत्तसंस्था : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत जिंकू किंवा हरू; पण आम्ही आमच्या 'बॅझबॉल' शैलीतच खेळू, असा इरादा इंग्लंडच्या कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम याने व्यक्त केला आहे. आक्रमक शैलीत खेळताना इंग्लंडच्या कसोटी संघाने दर्जेदार कामगिरी केल्याचे समाधान असले, तरी आता पुढील वर्षी भारतात होणार्‍या कसोटी मालिकेत आम्हाला सर्वात मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागेल, असेही तो म्हणाला.

मॅक्युलमची प्रशिक्षकपदी निवड झाल्यापासून इंग्लंडचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक शैलीत खेळताना दिसत आहे. 'बॅझ' हे मॅक्युलमचे टोपणनाव असल्याने इंग्लंडच्या आक्रमक शैलीतील खेळाला 'बॅझबॉल' असे संबोधले जात आहे. मॅक्युलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकली, तर न्यूझीलंडमध्ये झालेली मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. मात्र, भारतीय संघाला मायदेशात नमवणे हे सर्वात अवघड आव्हान मानले जाते. पुढील वर्षी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान इंग्लंडच्या संघाला या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

'भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मी खूप उत्सुक आहे. सर्वोत्तम संघांविरुद्ध स्वत:ला सिद्ध करण्याचा तुमचा प्रयत्न असतो आणि घरच्या मैदानांवर भारतापेक्षा कोणताही संघ चांगली कामगिरी करत नाही. आमच्यासाठी हे मोठे आव्हान असेल. आम्ही यशस्वी ठरलो तर उत्तमच; पण अपयशी ठरलो तरी आम्ही आमची खेळण्याची शैली बदलणार नाही,' असे ब्रेंडन मॅक्युलम याने सांगितले.

SCROLL FOR NEXT