ऐतिहासिक लॉर्डस् मैदानावर आजपासून (दि. 10) सुरू होणार्या तिसर्या कसोटी सामन्यात भारत-इंग्लंडचे उभय संघ पुन्हा एकदा आपले सर्वस्व पणाला लावत मालिकेत आघाडी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे यजमान इंग्लंड संघाच्या फलंदाजांची मोठी कसोटी लागणार आहे. दरम्यान, लॉर्ड्स कसोटीसाठी संघ व्यवस्थापन कुलदीप की नितीश कोणाला निवडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारताने एजबॅस्टन कसोटीत तीन अष्टपैलू खेळाडू खेळवले, ज्यात रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोन फिरकीपटूंचा समावेश आहे. या दोघांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. नितीश रेड्डी हा भारतीय संघातील एकमेव वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. आता संघ व्यवस्थापन फिरकीपटू कुलदीप यादव की नितीशला खेळवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.लॉर्ड्समध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल आणि अतिरिक्त वेगवान गोलंदाज असणे चांगले आहे. नितीशची उपस्थिती फलंदाजीसाठीही उपयुक्त ठरेल, असे मानले जात आहे.
सपाट खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांचे जबरदस्त यश यजमान संघासाठी तोट्याचे ठरले आहे. त्यामुळेचे लॉर्ड्सवर चेंडूला चांगली सीम आणि स्विंग मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, प्रतिष्ठित लॉर्ड्स मैदानावर असलेला विशिष्ट उतारा एक वेगळे आव्हान असेल.
भारतीय संघाचे फलंदाज आतापर्यंत चांगल्या लयीत दिसले आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजाची समस्या अद्यापही कायम आहे. पहिल्या कसोटीत साई सुदर्शन विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याला दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले. दुसऱ्या कसोटीत करुण नायरला तिसऱ्या क्रमांकावर चांगली सुरुवात मिळाली; परंतु तो मोठ्या खेळीत रूपांतर करू शकला नाही. तरी, तिसऱ्या कसोटीसाठी त्याला संघात कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. कारण विजय संघ कायम राहिल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
बुमराहच्या पुनरागमनामुळे प्रसिद्ध कृष्णाला संघाबाहेर बसावे लागू शकते. तो आतापर्यंत पूर्ण लयीत दिसलेला नाही. लीड्स कसोटीनंतर भारतीय वेगवान गोलंदाजांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, परंतु आकाश दीप आणि मोहम्मद सिराज यांनी दुसऱ्या कसोटीत दाखवून दिले की ते कोणापेक्षा कमी नाहीत. आता या दोघांच्या साथीने बुमराहच्या समावेशामुळे गोलंदाजी अधिक भेदक झाली आहे.
इंग्लंडने आपल्या प्लेइंग-XI ची घोषणा केली आहे. जोफ्रा आर्चरच्या पुनरागमनामुळे इंग्लंडची गोलंदाजी अधिक मजबूत होईल. आर्चरने तब्बल साडेचार वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन केले आहे. इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीसाठी केवळ एक बदल केला आहे. जोश टंगच्या जागी आर्चरला संघात स्थान देण्यात आले आहे. टंगला वगळण्याचा इंग्लंड संघ व्यवस्थापनाचा निर्णय धक्कादायक आहे, कारण तो चालू मालिकेत दोन कसोटी सामन्यांमध्ये संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने दोन कसोटी सामन्यांत ११ बळी घेतले आहेत.
भारताचा संभाव्य संघ : शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
इंग्लंडचा घोषित संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर
Ind vs Eng Test Playing 11