नवी दिल्ली : श्रीलंका येथे ९ जूनपासून सुरू होणाऱ्या 'इंडिया-ए' संघाच्या वनडे ट्राय-सीरीजसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघात महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे युवा फलंदाज रियान पराग या मालिकेतून बाहेर पडला असून, त्याच्या जागी अनुभवी ऋतुराज गायकवाडची संघात निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआयने ऋतुराज गायकवाडकडे या मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवली आहे.
या ट्राय-सीरीजसाठी सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या संघात तिलक वर्माकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती, तर रियान पराग उपकर्णधार होता. मात्र, परागला झालेल्या दुखापतीमुळे आता संघात पुनर्रचना करण्यात आली आहे. बीसीसीआयने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, रियान पराग आता पुढील काही काळ बंगळुरू येथील 'सेंटर ऑफ एक्सलन्स'मध्ये राहून आपल्या दुखापतीवर उपचार (रिहॅबिलिटेशन) करून घेणार आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना परागला हॅमस्ट्रिंगच्या समस्येने त्रस्त केले होते. या दुखापतीमुळेच आयपीएलमधील काही महत्त्वाच्या सामन्यांत त्याला मुकावे लागले होते आणि त्याच्या अनुपस्थितीत यशस्वी जयस्वालने संघाची धुरा सांभाळली होती.
श्रीलंकेत होणाऱ्या या वनडे ट्राय-सीरीजमध्ये भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे तीन 'ए' संघ आमने-सामने येणार आहेत. मालिकेचा पहिला सामना ९ जून रोजी होणार असून, २१ जून रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. मालिकेतील सर्व सामने दांबुला स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १० वाजल्यापासून खेळवले जातील. या स्पर्धेत प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध दोन सामने खेळणार आहे.
तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), प्रियांश आर्या, वैभव सूर्यवंशी, आयुष बडोनी, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), विपराज निगम, यश ठाकूर, युद्धवीर सिंग, अंशुल कंबोज, अरशद खान आणि अनुकूल रॉय.
या मालिकेत सर्वांचे लक्ष १५ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी याच्या कामगिरीवर केंद्रित असणार आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामात आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रभावित करणाऱ्या वैभवसाठी ही मालिका त्याच्या कारकिर्दीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भारताच्या युवा ताफ्याला या मालिकेत आपली छाप पाडण्याची मोठी संधी आहे.