स्पोर्ट्स

India Squad vs West Indies: विंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! रोहित-विराट, वैभव सूर्यवंशी संघात; हार्दिक-पंतला डच्चू

पंजाबचा नमन धीर; जम्‍मू काश्‍मीरचा आकिब नबी यांना संधी : हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष : २७ सप्टेंबरपासून तीन वन-डे व पाच टी-२० सामने

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने एकदिवसीय (ODI) आणि आंतरराष्ट्रीय टी-२० अशा दोन्ही मालिकांसाठी वेगवेगळे संघ जाहीर केले आहेत. एकदिवसीय मालिकेसाठी शुभमन गिलकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली असून, ज्येष्ठ फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.

वन-डे मालिकेसाठी भारतीय संघात पंजाबचा युवा अष्टपैलू खेळाडू नमन धीर आणि जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी यांना प्रथमच संधी देण्यात आली, तर अनुभवी हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांना वेगवेगळ्या कारणांमुळे संघातून वगळण्यात आले आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यात २७ सप्टेंबरपासून तिरुवनंतपूरम येथे तीन वन-डे आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

दुसरीकडे, टी-२० संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले असून युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला संघात संधी मिळाली आहे; तर तिलक वर्मा याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, निवड समितीने रणजी विजेत्या जम्मू-काश्मीर संघाविरुद्ध होणाऱ्या प्रतिष्ठित इराणी कप लढतीसाठी 'रेस्ट ऑफ इंडिया' संघाचीही निवड केली आहे.

एकदिवसीय संघात शुभमन गिल कर्णधार, तर केएल राहुल उपकर्णधार आणि यष्टीरक्षकाच्या दुहेरी भूमिकेत दिसेल. या संघात अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या उपस्थितीमुळे फलंदाजीला मोठा आधार मिळणार आहे. याव्यतिरिक्त ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल आणि नमन धीर यांना फलंदाजीत संधी देण्यात आली असून, ध्रुव जुरेलची यष्टीरक्षक म्हणून निवड झाली आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या श्रेणीत नितीश कुमार रेड्डी आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. गोलंदाजीची मदार कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकिब नबी आणि गुरनूर ब्रार यांच्या खांद्यावर असेल. अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाला विलंब होत असल्याने नितीश कुमार रेड्डी याला आधी जाहीर केलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघातून वगळून थेट एकदिवसीय संघात पाचारण करण्यात आले आहे.

दुसरीकडे, भारताच्या टी-२० संघात फारसे मोठे फेरबदल करण्यात आलेले नाहीत. मात्र, वेगवान गोलंदाज मयांक यादव आणि प्रिन्स यादव यांनी संघात पुनरागमन करत आपली जागा पक्की केली आहे.

वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना २७ सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे खेळवला जाईल, तर दुसरा सामना ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटी आणि तिसरा अंतिम सामना ३ ऑक्टोबर रोजी न्यू चंदिगढ येथे होणार आहे. त्यानंतर उभय संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी लखनौ, दुसरा सामना ९ ऑक्टोबर रोजी रांची, तिसरा सामना ११ ऑक्टोबर रोजी इंदूर, चौथा सामना १४ ऑक्टोबर रोजी हैदराबाद आणि पाचवा व अखेरचा टी-२० सामना १६ ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथे खेळवला जाईल.

भारताचा टी२० संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयांक यादव.

इराणी चषक / शेष भारत संघ : ऋषभ पंत (कर्णधार, यष्टिरक्षक), सनत सांगवान, शिखर मोहन, सुदीप घारामी, सर्फराज खान (उपकर्णधार), स्मरण रविचंद्रन, मानव सुतार, सारांश जैन, आकाश दीप, मुकेश कुमार, मुकेश चौधरी, आर्यन जुयाल (यष्टिरक्षक), आर्यन पांडे, अनुकूल रॉय, आयुष दोसेजा.

जपान टी-२० आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्‍टिरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी, यश ठाकूर, विपराज निगम.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT