झिम्बाब्वे दौऱ्यात शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.  File Photo
स्पोर्ट्स

India vs Zimbabwe: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! शुभमन गिल कर्णधार

युवा खेळाडू अभिषेक शर्मा, रियान पराग यांना संधी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : India vs Zimbabwe : झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यावर शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. याशिवाय अनेक युवा खेळाडूंनाही संघात संधी देण्यात आली आहे. तर बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

नवी संघ नवा कर्णधार

  • BCCI ने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली

  • वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

  • या दौऱ्यावर शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत धुमाकूळ घालत आहे. संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. दरम्यान, भारतीय संघाला विश्वचषकानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर जायचे आहे. जिथे झिम्बाब्वे विरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.

या दौऱ्यासाठी कशी संघ निवड केली जाते याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले होते. त्यातच कोणत्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाईल आणि कोणत्या युवा खेळाडूंना स्थान मिळेल याची उत्सुकता लागली होती.

टी-20 विश्वचषक स्पर्धेतील मुख्य संघात समाविष्ट असलेल्या 15 पैकी 13 खेळाडूंना या दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी विश्वचषक संघातून केवळ यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांची निवड करण्यात आली आहे.

शुभमन गिल, आवेश खान, रिंकू सिंग आणि खलील अहमद यांची टी-20 विश्वचषकासाठी प्रवासी राखीव म्हणून निवड करण्यात आली होती आणि ते मुख्य संघाचा भाग नव्हते. पण हे तिघांनाही आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात स्थान मिळाले आहे.

गिल पहिल्यांदाच कर्णधार

शुभमन गिल वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी भारताचे कर्णधारपद भूषवणार आहे. 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या नेतृत्वाखाली भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या ऋतुराज गायकवाडला कर्णधारपद न देणे धक्कादायक आहे. पण टी-20 फॉरमॅटच्या इतिहासात गिल भारताचा 14वा कर्णधार बनणार आहे. गिलने आपल्या टी-20 कारकिर्दीत भारतासाठी आतापर्यंत 14 सामन्यांत 335 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतकांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवड समितीने सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याला या दौऱ्यावर जाण्याबद्दल विचारले होते, परंतु दोघांनीही विश्रांती घेणार असल्याचे सांगितले. अशा स्थितीत गिल यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले.

रायन-नितीश आणि अभिषेकला संधी मिळाली

आयपीएल 2024 च्या मोसमात चमक दाखवणाऱ्या खेळाडूंची या दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये अभिषेक शर्मा, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी या नावांचा समावेश आहे.

झिम्बाब्वे मालिकेसाठी भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, रायन पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.

भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा (जुलै 2024)

6 जुलै : पहिला टी-20 सामना, हरारे

7 जुलै : दुसरा टी-20 सामना, हरारे

10 जुलै : तिसरा टी-20 सामना, हरारे

13 जुलै : चौथा टी-20 सामना, हरारे

14 जुलै : पाचवा टी-20 सामना, हरारे

नितीश रेड्डी

आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या अभिषेक शर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांना निवडकर्त्यांनी संधी दिली आहे. दोघांची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झाली आहे. नितीश हा भारताच्या ब संघाचा भाग आहे. त्याने गेल्या मोसमात सनरायझर्सकडून 13 सामन्यांत 303 धावा केल्या होत्या. त्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. एवढेच नाही तर त्याने 3 विकेट्सही घेतल्या.

अभिषेक शर्माने

आयपीएल 2024 मध्ये 23 वर्षीय स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने सनरायझर्स हैदराबादसाठी ओपनिंग करताना आश्चर्यकारक कामगिरी केली. या युवा फलंदाजाने 16 सामन्यांत झंझावाती फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने 200 च्या वर स्ट्राइक रेटने 484 धावा केल्या. आता त्याचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. निळ्या जर्सीमध्ये त्याला बॅटने धमाका करताना पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.

रियान पराग

आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू रियान परागच्या मेहनतीला अखेर फळ मिळाले आहे. त्याने या मोसमात राजस्थान रॉयल्ससाठी 52 पेक्षा जास्त सरासरीने 573 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जचा स्टार वेगवान गोलंदाज म्हणून उदयास आलेल्या तुषार देशपांडेचीही भारतीय संघात निवड झाली आहे. देशपांडेने या मोसमात 17 विकेट घेतल्या आणि सीएसकेसाठी मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT