स्पोर्ट्स

Team India Schedule : टीम इंडियाचा पुढील सामना कधी? जाणून घ्या वनडे-T20-कसोटी मालिकांचे वेळापत्रक

Team India Matches : चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पुन्हा एकदा मैदानावर पाहण्याची तीव्र उत्सुकता आहे.

रणजित गायकवाड

team india upcoming schedule vs aus odi and t20i series and vs south africa test series

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. १९ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आरंभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण दौऱ्यात भारताला तीन एकदिवसीय (वनडे) आणि पाच टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळायची आहे.

‘मिशन ऑस्ट्रेलिया'साठी भारतीय संघ सज्ज’

वेस्ट इंडिजला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आता 'मिशन ऑस्ट्रेलिया'साठी रवाना होणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज खेळाडूंचे संघात पुनरागमन होणार आहे. रोहित आणि विराटने टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने, चाहत्यांना त्यांना पुन्हा एकदा मैदानावर पाहण्याची तीव्र उत्सुकता आहे.

टीम इंडियाचा पुढील सामना १९ ऑक्टोबर रोजी आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होईल आणि मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला जाईल.

टीम इंडियाच्या पुढील व्यस्त वेळापत्रकाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक

वृत्तानुसार, संघ १५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय आणि पाच टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने आधीच संघाची घोषणा केली आहे.

प्रथम तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल, ज्यातील पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर २३ आणि २५ ऑक्टोबर रोजी उर्वरित दोन सामने होतील. एकदिवसीय मालिका संपल्यानंतर पाच सामन्यांच्या टी२० मालिकेचा थरार रंगेल.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक तारीख आणि वेळ :

एकदिवसीय सामने

  • पहिला सामना : १९ ऑक्टोबर : सकाळी ९ वाजता

  • दुसरा सामना २३ ऑक्टोबर : सकाळी ९ वाजता

  • तिसरा सामना : २५ ऑक्टोबर : सकाळी ९ वाजता

टी२० मालिका

  • पहिला टी२० सामना : २९ ऑक्टोबर : दुपारी १.४५ वाजता

  • दुसरा टी२० सामना ३१ ऑक्टोबर : दुपारी १.४५ वाजता

  • तिसरा टी२० सामना : २ नोव्हेंबर : दुपारी १.४५ वाजता

  • चौथा टी२० सामना : ६ नोव्हेंबर : दुपारी १.४५ वाजता

  • पाचवा टी२० सामना : ८ नोव्हेंबर : दुपारी १.४५ वाजता

नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका

नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांसह तीन एकदिवसीय आणि पाच टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होईल. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असल्याने तिला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

  • पहिला कसोटी सामना : १४ ते १८ नोव्हेंबर, कोलकाता (ईडन गार्डन्स)

  • दुसरा कसोटी सामना : २२ नोव्हेंबरपासून, गुवाहाटी

एकंदरीत, भारतीय क्रिकेट संघ कसोटी, एकदिवसीय आणि टी२० अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये सतत व्यस्त राहणार आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये न खेळणाऱ्या खेळाडूंना थोडाफार आराम मिळेल, परंतु प्रमुख खेळाडूंना दीर्घ विश्रांती मिळण्याची शक्यता कमी आहे. संघासाठी हे वेळापत्रक सांभाळणे एक मोठे आव्हान असेल.

ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान भारतीय संघ कसा प्रदर्शन करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. विशेषतः, एकदिवसीय मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची फलंदाजी आणि फिटनेस यावर करडी नजर असणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय संघ :

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टी२० संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उप-कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर.

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ :

मिशेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, ॲलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), कूपर कोनोली, बेन ड्वार्शिस, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), मॅथ्यू कुहनेमन, मिशेल ओवेन, जोश फिलिप (यष्टिरक्षक), मॅट रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिशेल स्टार्क, ॲडम झम्पा.

ऑस्ट्रेलिया टी-२० संघ (पहिले दोन सामने):

मिशेल मार्श (कर्णधार), सीन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, टीम डेविड, बेन ड्वार्शिस, नाथन एलिस, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, जोश इंगलिस, मॅथ्यू कुहनेमन, मिशेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, ॲडम झम्पा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT